
Maharashtra, 22 एप्रिल (हिं.स.)अभिषेक शर्माचे शतक आणि इशान मलिंगाच्या उत्कृष्ट गोलंदाजीच्या जोरावर सनरायझर्स हैदराबादने विजयाची हॅटट्रिक साधली. आयपीएल २०२६ च्या ३१ व्या सामन्यात संघाने दिल्ली कॅपिटल्सला ४७ धावांनी पराभूत केले. २४३ धावांचे लक्ष्य गाठताना, अक्षर पटेलच्या नेतृत्वाखालील संघ केवळ १९५ धावाच करू शकला. नितीश राणाने सर्वाधिक ५७ धावा केल्या. इशान मलिंगाने ३२ धावांत चार बळी घेतले. शकिब हुसेनने पुन्हा एकदा किफायतशीर गोलंदाजी करत चार षटकांत केवळ २९ धावा दिल्या.
अभिषेकच्या नाबाद १३५ धावा आणि हेनरिक क्लासेनच्या १३ चेंडूंतील ३७ धावांच्या जोरावर हैदराबादने २४२ धावांपर्यंत मजल मारली. अभिषेकने आपले दुसरे आयपीएल शतक झळकावले, त्याच्या या खेळीत १० षटकार आणि तितकेच चौकार होते. क्लासेननेही तीन षटकार आणि तितकेच चौकार मारले. हैदराबादचा सात सामन्यांमधील हा चौथा आणि सलग तिसरा विजय होता. दिल्लीला पराभूत करत, इशान किशनच्या नेतृत्वाखालील संघ तिसऱ्या स्थानावर पोहोचला.
दिल्लीटी सुरुवात लक्ष्याचा पाठलाग करताना खराब झाली. तिसऱ्या षटकात दिलशान मदुशंकाने पथुम निस्संका (८) याला बाद केले. केएल राहुल आणि राणा यांनी दुसऱ्या विकेटसाठी ८६ धावांची भागीदारी करून दिल्लीला मजबूत स्थितीत आणले. राहुलला मोकळेपणाने खेळता आले नाही, पण राणाला अशा कोणत्याही अडचणींचा सामना करावा लागला नाही. त्याच्यामुळेच दिल्लीला आवश्यक धावगती नियंत्रणात ठेवता आली. दिल्लीने पॉवरप्लेमध्ये ५९ धावा केल्या. शकिब हुसेनच्या गोलंदाजीवर एक चौकार आणि तीन षटकार मारून राहुल ३७ धावांवर बाद झाला. समीर रिझवीने २८ चेंडूंमध्ये ४१ धावा केल्या आणि अक्षर पटेल (२) देखील फार काही करू शकला नाही.
राणाने आयपीएल २०२६ मधील आपले पहिले अर्धशतक २७ चेंडूंमध्ये पूर्ण केले, पण थोड्याच वेळात तो मलिंगाच्या गोलंदाजीवर अभिषेक शर्माच्या हाती झेलबाद झाला. डेव्हिड मिलर पहिल्याच चेंडूवर त्रिफळाचीत झाल्याने निराश झाला. ट्रिस्टन स्टब्सने मलिंगाला हॅट-ट्रिक करण्यापासून रोखले, पण तोही मोठी खेळी करू शकला नाही. तीन चौकार आणि एका षटकारासह १६ चेंडूंमध्ये २७ धावा करून तो मलिंगाचा तिसरा बळी ठरला. आशुतोष शर्मा १० चेंडूंमध्ये केवळ १४ धावाच करू शकला आणि तोही मलिंगाच्या गोलंदाजीवर बाद झाला.
हैदराबादच्या डावाचा पाया अभिषेकभोवती फिरत होता. त्याने डावाची सुरुवात केली आणि शेवटपर्यंत आपली जागा टिकवून ठेवली. त्याने ट्रॅव्हिस हेड (३७) सोबत ८.५ षटकांत पहिल्या विकेटसाठी ९७ धावांची भागीदारी केली. या काळात अभिषेक जबरदस्त फॉर्मात होता आणि त्याने २५ चेंडूंमध्ये आपले अर्धशतक पूर्ण केले. हैदराबादने पॉवरप्लेमध्ये ६७ धावा केल्या. हेडने दोन चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने २६ चेंडूंमध्ये ३७ धावा केल्या, पण तो अक्षर पटेलच्या गोलंदाजीवर बाद झाला. कर्णधार इशान किशनसोबत अभिषेकने धावगती स्थिर ठेवत दुसऱ्या विकेटसाठी ७९ धावांची भागीदारी केली. दोन चौकार आणि एका षटकारासह १३ चेंडूंमध्ये २५ धावा करून किशन बाद झाला. अभिषेकच्या फटक्यावर तो नॉन-स्ट्राइक एंडला धावबाद झाला.
अभिषेकने ४७ चेंडूंमध्ये आपले दुसरे आयपीएल शतक पूर्ण केले, आणि ५० पेक्षा कमी चेंडूंमध्ये दोन आयपीएल शतके करणारा तो पहिला भारतीय ठरला आहे. त्याचे यापूर्वीचे शतक २०२५ मध्ये पंजाब किंग्सविरुद्ध आले होते, जेव्हा त्याने ४० चेंडूंमध्ये १०० धावा पूर्ण केल्या होत्या. अभिषेक आणि क्लासेन यांनी तिसऱ्या विकेटसाठी ७६ धावांची भागीदारी करून हैदराबादला २४२ धावांपर्यंत पोहोचवले. क्लासेनने शेवटच्या षटकांमध्ये १३ चेंडूंमध्ये तीन षटकार आणि तितक्याच चौकारांसह ३७ धावा केल्या. अभिषेकने १३५ धावा केल्या, जी आयपीएलमधील पाचवी सर्वोच्च खेळी ठरली. दिल्लीने सहा गोलंदाजांना संधी दिली, पण त्यापैकी कोणीही १० पेक्षा कमी इकॉनॉमी रेटने गोलंदाजी करू शकला नाही.
---------------
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे