
सोलापूर, 26 एप्रिल (हिं.स.)।
कवयित्री रेणुका महागांवकर यांच्या “हृदयस्थ” या काव्यसंग्रहातील कविता सर्वसामान्यांच्या जीवनाशी घट्ट नाळ जोडणाऱ्या असल्याने त्या थेट हृदयात स्थिरावतात, असे मत ज्येष्ठ कवी अशोक नायगांवकर यांनी व्यक्त केले. महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा दक्षिण सोलापूरच्या वतीने आयोजित कार्यक्रमात या काव्यसंग्रहाचे प्रकाशन अॅम्फी थिएटर येथे त्यांच्या हस्ते पार पडले.
कार्यक्रमास प्रमुख पाहुण्या म्हणून सुप्रसिद्ध गायिका सन्मिता धापटे-शिंदे उपस्थित होत्या. अॅम्फी थिएटर रसिक श्रोत्यांनी तुडुंब भरले होते.
नायगांवकर यांनी आपल्या खास शैलीत “कशाचा कशाला संबंध नाही” असे म्हणत रसिकांना खळखळून हसवले. पुढे बोलताना त्यांनी मराठी साहित्याची समृद्ध परंपरा पुढील पिढीपर्यंत पोहोचवण्याची गरज अधोरेखित केली. “प्रत्येक घरात पुस्तके असली पाहिजेत, तेव्हाच मराठीला अभिजात दर्जा मिळेल,” असे ते म्हणाले. पूर्वी घरकाम, शेतकाम करतानाही कविता निर्माण होत असत, मात्र आजच्या यांत्रिक जीवनात माती आणि माणूस यांच्यात दुरावा निर्माण झाल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली.
प्रमुख पाहुण्या सन्मिता धापटे-शिंदे यांनी “कविता लिहणे म्हणजे स्वतःला उलगडत जाण्याची प्रक्रिया आहे,” असे सांगत कवयित्रीच्या अभिव्यक्तीचे कौतुक केले. कवयित्री रेणुका महागांवकर यांनी आपल्या मनोगतात काव्यसंग्रह लिहितानाचे अनुभव सांगत, “सोप्या भाषेत सर्वसामान्यांच्या जीवनातील भावना कमी शब्दांत मांडण्याचा प्रयत्न केला,” असे नमूद केले.
कार्यक्रमात “हृदयस्थ” मधील निवडक कविता अमेरिकास्थित मधुरा गोडबोले, शलाका डोळस, प्रियांका पाटील, गणेश शिंदे आणि समृद्धी देशपांडे यांनी सादर केल्या. तसेच काव्यसंग्रहासाठी योगदान देणाऱ्या सहकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाला महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा दक्षिण सोलापूरचे पदाधिकारी, विविध क्षेत्रातील मान्यवर आणि मोठ्या संख्येने रसिक उपस्थित होते. सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन माधव देशपांडे यांनी केले.
कवी अशोक नायगांवकर यांनी सादर केलेल्या एका कवितेच्या शेवटी “मला भाजपामध्ये जावंसं वाटतंय” अशी ओळ येताच सभागृहात हास्याची लाट उसळली. यावर पंढरपूर-माढा मतदारसंघाचे आमदार अभिजित पाटील यांनी खळखळून हसत दाद देत, “मनातलं नायगांवकरांनी बोलून दाखवलं,” असा हलकाफुलका प्रतिसाद दिला.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड