
चेन्नई, 26 एप्रिल (हिं.स.)गुजरात टायटन्सने चेन्नई सुपर किंग्सला आठ विकेट्स राखून पराभूत केले. नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना, चेन्नईने चेपॉकमध्ये २० षटकांत सात विकेट्स गमावून १५८ धावा केल्या. कर्णधार ऋतुराज गायकवाडने ७४ धावांची शानदार नाबाद खेळी केली. प्रत्युत्तरात, साई सुदर्शनच्या ८७ धावांच्या जोरावर गुजरातने विजय मिळवला. सुदर्शन व्यतिरिक्त, कर्णधार शुभमन गिलने ३३ धावा आणि जोस बटलरने नाबाद ३९ धावा केल्या. या विजयामुळे, गुजरात आठ सामन्यांतून आठ गुणांसह पाचव्या स्थानावर पोहोचला आहे, ज्यात चार विजय आणि चार पराभव आहेत. चेन्नई आठ सामन्यांतून तीन विजय आणि पाच पराभवांसह सहाव्या स्थानावर आहे. गुजरातचा पुढील सामना ३० एप्रिल रोजी अहमदाबादमध्ये आरसीबीविरुद्ध आहे. सीएसकेचा सामना २ मे रोजी चेपॉकमध्ये मुंबई इंडियन्सशी होईल.
तत्पूर्वी, चेन्नई सुपर किंग्सने सात विकेट्स गमावून १५८ धावा केल्या होत्या. कर्णधार ऋतुराज गायकवाडने अखेर लय पकडली आणि सहा चौकार व चार षटकारांसह ६० चेंडूंमध्ये ७४ धावा करून तो नाबाद राहिला. सीएसकेच्या इतर कोणत्याही फलंदाजाने चांगली कामगिरी केली नाही.पॉवरप्लेमध्ये सीएसकेने २८ धावांत तीन विकेट्स गमावल्या होत्या. संघाने १२व्या षटकात ५० धावा पूर्ण केल्या. संजू सॅमसनने ११ धावा, उर्विल पटेलने चार धावा केल्या आणि बदली क्रिकेटपटू म्हणून आलेला सरफराज खान शून्यावर बाद झाला. देवाल्ड ब्रेविसलाही केवळ दोन धावा करता आल्या. त्यानंतर ऋतुराजने शिवम दुबेसोबत ४३ चेंडूंमध्ये ५९ धावांची भागीदारी केली, ज्यात दुबेने १७ चेंडूंमध्ये २२ धावा केल्या.
जेमी ओव्हरटनने सहा चेंडूंमध्ये १८ धावा केल्या, तर कार्तिक शर्माने नऊ चेंडूंमध्ये १५ धावा केल्या. गुजरातकडून रबाडाने तीन, तर अर्शद खानने दोन विकेट्स घेतल्या. सिराज आणि मानव सुथार यांना प्रत्येकी एक विकेट मिळवली. राशिद खानने केवळ एकच षटक टाकले आणि आयपीएलच्या इतिहासात असे पहिल्यांदाच घडले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे