अहमदपूरमध्ये रंगला 'काव्यजागर'; रसिक झाले मंत्रमुग्ध
लातूर, 28 एप्रिल (हिं.स.)। रखरखत्या उन्हाने वातावरण तापलेले असताना अहमदपूर येथील संस्कृती गार्डनमध्ये शब्दांच्या सुरांनी आणि भावनांच्या वर्षावाने साहित्याचा एक वेगळाच ''गारवा'' निर्माण केला. निमित्त होते, अहमदपूरच्या सांस्कृतिक इतिहासात नवा अध्या
काव्यजागर


लातूर, 28 एप्रिल (हिं.स.)। रखरखत्या उन्हाने वातावरण तापलेले असताना अहमदपूर येथील संस्कृती गार्डनमध्ये शब्दांच्या सुरांनी आणि भावनांच्या वर्षावाने साहित्याचा एक वेगळाच 'गारवा' निर्माण केला. निमित्त होते, अहमदपूरच्या सांस्कृतिक इतिहासात नवा अध्याय लिहिणाऱ्या 'काव्यजागर २०२६' या दिमाखदार सोहळ्याचे. उपविभागीय पोलीस अधिकारी अरविंद रायबोले यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या 'काव्यजागर प्रतिष्ठान'च्या वतीने आयोजित या निमंत्रितांच्या कवी संमेलनाचे उद्घाटन राज्याचे सहकार मंत्री नामदार बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते वट वृक्षाला पाणी घालून अत्यंत उत्साहात संपन्न झाले. या सोहळ्याने तब्बल साडेतीन तास अहमदपूरकर रसिकांना साहित्याच्या जादूने खिळवून ठेवले.

याप्रसंगी बोलताना सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी साहित्याचे महत्त्व अधोरेखित केले. कविता म्हणजे केवळ शब्दांची मांडणी नसून ती मनातील भावना, समाजातील वास्तव आणि जीवनातील अनुभवांचे प्रतिबिंब असते, असे मत त्यांनी व्यक्त केले. कवी आपल्या लेखणीतून समाजाला दिशा देण्याचे महत्त्वाचे कार्य करत असल्याचे सांगून त्यांनी संत साहित्यापासूनच्या समृद्ध परंपरेचा दाखला दिला. ग्रामीण भागात अशा उपक्रमांमुळे नवोदित कवींना मोठे व्यासपीठ उपलब्ध होईल, अशा शब्दांत त्यांनी काव्यजागर प्रतिष्ठानच्या कार्याचे कौतुक केले. विशेष म्हणजे, आपल्या व्यस्त नियोजनातून वेळ काढून नामदार पाटील यांनी कवींच्या कवितांचा आस्वाद घेतल्यामुळे उपस्थितांचा उत्साह अधिकच वाढला होता.

प्रसिद्ध गझलकार डॉ. मुकुंद राजपंखे यांच्या अध्यक्षतेखाली ही काव्यमैफिल सजली होती. यामध्ये मुंबईचे लोककवी प्रशांत मोरे यांनी आपल्या पहाडी आवाजात लोकसंस्कृतीचे दर्शन घडवले, तर कोल्हापूरचे विश्वास पाटील यांनी सामाजिक भावनांना वाचा फोडली. इचलकरंजीचे रोहित शिंगे यांनी हळुवार प्रेम कविता सादर केल्या, तर छत्रपती संभाजीनगरच्या कवयित्री गुंजन पाटील यांनी स्त्रियांच्या वेदना आणि भावनांना शब्दांत गुंफले. यवतमाळचे गझलकार आबेद शेख आणि अहमदपूरचे अनिल चवळे यांच्या रचनांनीही रसिकांची दाद मिळवली. कवी राजसाहेब कदम यांनी आपल्या शैलीदार सूत्रसंचालनातून कवी आणि श्रोत्यांमध्ये शेवटपर्यंत भावनिक नाते टिकवून ठेवले.

अनेक वर्षांनंतर अहमदपूरकरांनी साहित्यासाठी अशी अलोट गर्दी अनुभवली होती. डॉक्टर, वकील, प्राध्यापक, व्यापारी, शिक्षक आणि महिलांची उपस्थिती या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण ठरली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अरविंद रायबोले यांनी केले, ज्यामध्ये त्यांनी 'काव्यजागर' मागची आपली भूमिका आणि साहित्याप्रती असलेली ओढ स्पष्ट केली. प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष प्रा. अनिल चवळे यांनी उपस्थितांचे स्वागत करून मनोगत व्यक्त केले. उद्घाटन कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन कपिल बिरादार यांनी केले, तर चंद्रशेखर भालेराव यांनी आभार मानले. या सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी गोविंद काळे, पोलीस निरीक्षक विनोद मेत्रेवार, गोविंद शेळके, महेंद्र खंडागळे , डॉ.चंद्रकांत उगीले, भरत इगे, माधव वलसे आणि मोहीब कादरी यांनी विशेष परिश्रम घेतले. अहमदपूरच्या सांस्कृतिक इतिहासात ही मैफिल 'अविस्मरणीय' म्हणून नोंदवली गेली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande