
- भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष संजय सिंह यांनी विनेश फोगाटचे आरोप फेटाळले
नवी दिल्ली, 28 एप्रिल, (हिं.स.)भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष संजय सिंह यांनी कुस्तीपटू विनेश फोगाटचा हा दावा फेटाळून लावला आहे की, डब्ल्यूएफआय तिला पुढील महिन्यात होणाऱ्या राष्ट्रीय खुल्या मानांकन स्पर्धेत सहभागी होण्यापासून रोखत आहे. सिंह यांनी सांगितले की, विनेशची नोंदणी आधीच पूर्ण झाली आहे आणि ती विनाकारण हा मुद्दा का निर्माण करत आहे, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये ५० किलो वजनी गटातील कुस्तीच्या सुवर्णपदकाच्या अंतिम सामन्याच्या दिवशी सकाळी वजन मर्यादेपेक्षा १०० ग्रॅम जास्त वजन आढळल्याने विनेश फोगटला अपात्र ठरवण्यात आले होते. आदल्या दिवशी तिचे वजन मर्यादेत होते, परंतु दुसऱ्या दिवशी १०० ग्रॅम वजन वाढल्यामुळे तिला अपात्र ठरवण्यात आले. या हृदयद्रावक घटनेनंतर, भारतीय कुस्तीपटू विनेशने कुस्तीतून निवृत्ती जाहीर केली होती. पण, गेल्या डिसेंबरमध्ये तिने आपल्या निवृत्तीचा निर्णय बदलला आणि कुस्तीमध्ये पुनरागमन करण्याची घोषणा केली.
त्यानंतर विनेशने खुलासा केला की, ती पुढच्या महिन्यात होणाऱ्या राष्ट्रीय खुल्या मानांकन स्पर्धेत सहभागी होण्याची योजना आखत होती. पण तिला नोंदणी करता आली नाही. तिने या संदर्भात डब्ल्यूएफआय अधिकाऱ्यांशी संपर्क साधला, पण तिला कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. तिने फेडरेशनवर कुस्तीमध्ये तिच्या पुनरागमनात हेतुपुरस्सर अडथळा आणल्याचा आरोप केला. पण डब्ल्यूएफआय प्रमुख संजय सिंग यांनी हा दावा फेटाळून लावला.
विनेश म्हणाली, मी राष्ट्रीय खुल्या मानांकन स्पर्धेत परतण्याची आशा करत आहे. त्यासाठीची नोंदणी ३० एप्रिलपर्यंत खुली होती. पण, जेव्हा मी नोंदणी करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा पोर्टलवर नोंदणी बंद असल्याचे दिसत होते. मी फेडरेशनच्या प्रशासकीय कर्मचाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत आहे, पण त्यांनी माझ्या फोनला उत्तर दिलेले नाही.
विनेश म्हणाली की, फेडरेशन कपमध्येही तिला अशाच समस्यांना सामोरे जावे लागले होते आणि शेवटच्या क्षणी निवडीचे निकष बदलण्यात आले होते. ती म्हणाली, असे वाटते की, डब्ल्यूएफआय हेतुपुरस्सर तिला परत येण्यापासून रोखत आहे.
डब्ल्यूएफआय अध्यक्ष संजय सिंग यांनी विनेश फोगटचे आरोप फेटाळून लावले आणि सांगितले की, इतर कुस्तीपटूंनाही अशाच समस्यांना सामोरे जावे लागले होते आणि त्या त्वरित सोडवण्यात आल्या होत्या.
सिंग म्हणाले, विनेश फोगटची नोंदणी आधीच पूर्ण झाली आहे. ती उगाचच गोंधळ का घालत आहे? आम्ही कोणत्याही कुस्तीपटूला सहभागी होण्यापासून थांबवलेले नाही; त्या सर्वांचे स्वागत आहे. माध्यमांशी बोलण्याऐवजी तिने कुस्तीवर लक्ष केंद्रित केले पाहिजे. आतापर्यंत ८०० कुस्तीपटूंनी नोंदणी केली असून, कोणीही कोणतीही अडचण कळवलेली नाही.
---------------
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे