आयपीएल 2026 : बंगळुरुचा दिल्लीवर ‘रॉयल‘ विजय, कोहलीच्या 9 हजार धावा पूर्ण
नवी दिल्ली, 28 एप्रिल (हिं.स.) : रॉयल चॅलेंजर्स बंगळूरुने दिल्ली कॅपिटल्सला अवघ्या ३९ चेंडूंमध्ये नऊ विकेट्स राखून पराभूत केले. दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या आयपीएल सामन्यात, दिल्लीला १६.३ षटकांत केवळ ७५ धावा करता आल्या. प्रत्यु
विराट कोहली


नवी दिल्ली, 28 एप्रिल (हिं.स.) : रॉयल चॅलेंजर्स बंगळूरुने दिल्ली कॅपिटल्सला अवघ्या ३९ चेंडूंमध्ये नऊ विकेट्स राखून पराभूत केले. दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या आयपीएल सामन्यात, दिल्लीला १६.३ षटकांत केवळ ७५ धावा करता आल्या. प्रत्युत्तरात, आरसीबीने ६.३ षटकांत एक गडी गमावून ७७ धावा करत सामना जिंकला. विराट कोहलीनेही आयपीएलमध्ये ९,००० धावा पूर्ण केल्या.

सामन्याच्या दुसऱ्याच चेंडूवर साहिल पारखच्या रूपाने दिल्ली कॅपिटल्सला पहिला धक्का बसला. आपल्या पहिल्याच आयपीएल सामन्यात साहिलला खाते उघडता आले नाही. त्यानंतर एकापाठोपाठ एक गडी बाद होत संघाची पडझड झाली. यजमान संघाने अवघ्या आठ धावांत सहा गडी गमावले. त्यानंतर डेव्हिड मिलरने अभिषेक पोरेलसोबत सातव्या विकेटसाठी ३१ चेंडूंमध्ये ३५ धावांची भागीदारी करून संघाला सावरण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, धुळीचे वादळ सुरू झाल्याने सामना काही मिनिटांसाठी थांबवावा लागला. पण, सर्व क्रिकेटपटू मैदानावरच थांबले.

काही वेळाने सामना पुन्हा सुरू झाला. नवव्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर मिलर बाद झाला. त्याने तीन चौकारांसह १८ चेंडूंमध्ये १९ धावा केल्या, त्यानंतर अभिषेकने सूत्रे हाती घेत ३३ चेंडूंमध्ये ३० धावा केल्या. काईल जेमिसननेही संघासाठी १२ धावांचे योगदान दिले. आरसीबीकडून जोश हेझलवूडने १२ धावांत चार बळी घेतले, तर भुवनेश्वर कुमारने तीन बळी घेतले. रसिक सलाम दार, सुयश शर्मा आणि कृणाल पांड्या यांनी प्रत्येकी एक बळी घेतला.

सोपे लक्ष्य गाठताना आरसीबीने केवळ ६.३ षटकांत सामना जिंकला. जेकब बेथेलने २.५ षटकांत विराट कोहलीसोबत २६ धावांची भागीदारी केली. दोन षटकार आणि एका चौकारासह ११ चेंडूंमध्ये २० धावा करून बेथेल पॅव्हेलियनमध्ये परतला. त्यानंतर देवदत्त पडिक्कलने कोहलीसोबत २२ चेंडूंमध्ये नाबाद ५१ धावांची भागीदारी करून आरसीबीला सहज विजय मिळवून दिला. कोहली १५ चेंडूंमध्ये दोन षटकार आणि एका चौकारासह २३ धावांवर नाबाद राहिला, तर पडिक्कलने १३ चेंडूंमध्ये तीन षटकार आणि तितक्याच चौकारांसह नाबाद ३४ धावा केल्या. दिल्लीला एकमेव यश काईल जेमिसनच्या गोलंदाजीमुळे मिळाले.

विराट कोहलीने या सामन्यात इतिहास रचला. त्याने या स्पर्धेत ९,००० धावा पूर्ण केल्या. आयपीएलमध्ये ९,००० धावा करणारा विराट एकमेव फलंदाज ठरला. त्याने २७५ सामन्यांमध्ये आठ शतके आणि ६६ अर्धशतकांसह ९,०१२ धावा केल्या आहेत. दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध १,१७२ धावा करून कोहली आयपीएलमध्ये दिल्लीविरुद्ध सर्वाधिक धावा करणारा फलंदाजही ठरला. एकाच संघाविरुद्ध सर्वाधिक धावा करण्याचा विक्रमही त्याच्या नावावर आहे. त्याने चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध १,१७४ धावा केल्या. केकेआरविरुद्ध १,१६१ धावा करून रोहित शर्मा या यादीत तिसऱ्या स्थानावर आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे


 rajesh pande