
नवी दिल्ली, 28 एप्रिल (हिं.स.) : भारतीय क्रिकेट संघाचा स्टार खेळाडू विराट कोहली यांनी दिल्लीतील दिल्ली पब्लिक स्कूल येथे विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले. या भेटीदरम्यान त्यांनी क्रिकेट अकादमीचे उद्घाटनही केले.
विद्यार्थ्यांना संबोधित करताना कोहली यांनी आपल्या आयुष्यातील सुरुवातीच्या अनुभवांची आठवण करून दिली. लहान वयातच क्रिकेटला प्राधान्य देत त्यांनी आपले ध्येय कसे निश्चित केले, हे त्यांनी स्पष्ट केले. “मला शाळेत बोलण्याची फारशी सवय नाही, कारण क्रिकेटमुळे मी लवकरच शालेय वातावरणापासून दूर गेलो. मात्र, तुमच्यासमोर माझे अनुभव मांडताना मला आनंद होत आहे,” असे ते म्हणाले.त्यांनी विद्यार्थ्यांना शाळेतील वातावरणाचे महत्त्व पटवून देताना शिक्षकांचा आदर करण्याचे आवाहन केले. “शाळा ही केवळ शिक्षणाची जागा नसून, चांगला माणूस घडवण्याचे ठिकाण आहे. तुमच्या शिक्षकांचा आणि मार्गदर्शकांचा आदर करा, कारण ते तुम्हाला घडवण्यासाठी त्यांचा वेळ आणि आयुष्याचा भाग देत आहेत,” असे कोहली यांनी सांगितले.
आपल्या करिअरबाबत बोलताना त्यांनी सांगितले की, “मी लहानपणीच क्रिकेटला माझे करिअर बनवण्याचा निर्णय घेतला होता. माझ्या कुटुंबाला आणि शिक्षकांना स्पष्टपणे सांगितले की मला याच क्षेत्रात पुढे जायचे आहे.”
विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना त्यांनी स्वप्नांप्रती प्रामाणिक राहण्याचा सल्ला दिला. “तुम्हाला आयुष्यात काय करायचे आहे, याबद्दल स्वतःशी प्रामाणिक रहा आणि त्यासाठी पूर्ण ताकदीने प्रयत्न करा. तेव्हाच तुम्हाला तुमच्या क्षमतेची खरी जाणीव होईल,” असेही ते म्हणाले.कोहली यांच्या या प्रेरणादायी संवादामुळे विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.
------------------------
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे