
रायगड, 29 एप्रिल (हिं.स.)। रोहा पोलीस ठाणे हद्दीत रोहा-कोलाड मार्गावर झालेल्या दुचाकी अपघातात १७ वर्षीय युवकाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या प्रकरणी विधीसंघर्षित बालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.
पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मौजे किल्ला गावाच्या हद्दीत इंडियन ऑईल पेट्रोलपंपाजवळ रोहा-कोलाड रोडवर ही घटना घडली. विधीसंघर्षित बालक त्याच्या ताब्यातील पॅशन प्रो मोटारसायकल (एमएच-06/एएक्स-1793) भरधाव वेगाने व बेदरकारपणे चालवत होता. त्यावेळी दुचाकीवर पाठीला पाठ लावून उलटा बसलेला कु. अश्विन शंकर मिलगिरे (वय १७) याचा तोल गेला.
तोल गेल्याने अश्विन हा रस्त्यावर डोक्यावर पडला व त्याला गंभीर दुखापत झाली. उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
या प्रकरणी रोहा पोलीस ठाण्यात गुरनं. १०७/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता कलम 106(1), 281, 125(अ), 125(ब) तसेच मोटार वाहन कायदा कलम 184 आणि 134 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा पुढील तपास पोलीस हवालदार आशुतोष म्हात्रे करीत आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)