
नाशिक, 29 एप्रिल (हिं.स.)।
नाशिकमधील गाजत असलेल्या टीसीएस प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपींना न्यायालयाने २ मेपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणातील पाचव्या गुन्ह्यात ही कोठडी देण्यात आली असून तपास यंत्रणेसाठी हा महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.
या प्रकरणात पोलिसांनी आरोपींची सखोल चौकशी करण्यासाठी न्यायालयाकडे ८ दिवसांच्या पोलिस कोठडीची मागणी केली होती. तपासादरम्यान काही महत्त्वाचे धागेदोरे मिळाल्याचे सांगत अधिक वेळ आवश्यक असल्याचे पोलिसांनी न्यायालयासमोर मांडले. दुसरीकडे बचाव पक्षाकडून या मागणीस विरोध करण्यात आला.
दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने संतुलित भूमिका घेत आरोपींना ३ दिवसांची पोलिस कोठडी मंजूर केली. त्यामुळे आता आरोपी २ मेपर्यंत पोलिसांच्या ताब्यात राहणार आहेत. या कालावधीत पोलिसांकडून त्यांची सखोल चौकशी करून प्रकरणातील इतर पैलू उघड करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
दरम्यान, या प्रकरणामुळे नाशिकमध्ये मोठी चर्चा सुरू असून नागरिकांचे लक्ष तपासाच्या पुढील घडामोडींवर लागले आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आरोपींकडून आणखी माहिती मिळण्याची शक्यता असून तपास अधिक व्यापक होण्याची चिन्हे आहेत. पुढील काही दिवसांत या प्रकरणात आणखी खुलासे होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV