
नागपूर, 29 एप्रिल (हिं.स.) : पाकिस्तानातून बेकायदेशीररीत्या आयात करून मुंबईमार्गे नागपूरमध्ये आणण्यात आलेल्या संशयास्पद सौंदर्यप्रसाधनांचा मोठा साठा अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) जप्त केला आहे. नागपूरच्या इतवारी परिसरातील कासारपुरा गल्ली येथे मे. साईबाबा ट्रेडर्सवर टाकलेल्या छाप्यात सुमारे ₹15,186 किमतीचा माल जप्त करण्यात आला.
या कारवाईत “मेड इन पाकिस्तान” असे लेबल असलेली विविध सौंदर्यप्रसाधने विक्रीसाठी ठेवलेली आढळली. जप्त करण्यात आलेल्या उत्पादनांमध्ये गोरी ब्युटी क्रीम, फेस फ्रेश गोल्ड प्लस, गोल्डन स्टार ब्युटी क्रीम, गोरी व्हाइटनिंग बॉडी लोशन आणि गोरी व्हाइटनिंग सोप यांचा समावेश आहे.तपासणीदरम्यान या उत्पादनांवर आयात नोंदणी क्रमांक, बॅच क्रमांक, उत्पादन परवाना, उत्पादन व कालबाह्यता दिनांक तसेच घटकांची आवश्यक माहिती नसल्याचे स्पष्ट झाले. तसेच खरेदीसंबंधी कोणतीही अधिकृत बिले किंवा नोंदी उपलब्ध नसल्याचेही उघड झाले. काही उत्पादनांवर उत्पादकाचे नावही नव्हते. प्राथमिक तपासात ही उत्पादने पाकिस्तानातून बेकायदेशीररीत्या आयात करून मुंबईमार्गे नागपूरमध्ये आणण्यात आल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. या उत्पादनांमध्ये पारा आणि स्टिरॉइड्ससारखे घातक घटक असण्याची शक्यता असल्याने ती मानवी आरोग्यास गंभीर धोका निर्माण करू शकतात, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
या प्रकरणी नागपूरच्या तहसील पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. जप्त केलेल्या नमुन्यांना मुंबईतील शासकीय प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे. दरम्यान, या प्रकरणामागे मोठे रॅकेट कार्यरत असल्याचा संशय व्यक्त केला जात असून संपूर्ण पुरवठा साखळीचा तपास सुरू आहे.अन्न व औषध प्रशासनाने नागरिकांना अशा संशयास्पद आणि बेकायदेशीर सौंदर्यप्रसाधनांचा वापर टाळण्याचे आवाहन केले आहे.
--------------------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis