
जळगाव, 29 एप्रिल (हिं.स.) क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जळगाव, जिल्हा क्रीडा प्रशिक्षण केंद्र तसेच जळगाव जिल्हा खो-खो संघटनेच्या संयुक्त विद्यमाने उन्हाळी क्रीडा प्रशिक्षण शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. खेळाचा प्रसार व प्रचार करणे, विद्यार्थ्यांमध्ये क्रीडाविषयक आवड निर्माण करणे आणि खेळाडूंना तंत्रशुद्ध प्रशिक्षण देणे हा या शिबिरामागील मुख्य उद्देश आहे. दिनांक ०५ ते १४ मे २०२६ या कालावधीत हे शिबिर सकाळी ७.०० ते ९.०० व सायंकाळी ६.०० ते ८.०० या दोन सत्रांमध्ये आयोजित करण्यात येणार आहे. यामध्ये योगा प्रशिक्षण श्री छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुल येथे, तर खो-खो प्रशिक्षण जिल्हा संघ मैदान, जळगाव येथे होणार आहे. अनुभवी राज्य क्रीडा मार्गदर्शकांच्या मार्गदर्शनाखाली खेळाडूंना विनामूल्य प्रशिक्षण दिले जाणार आहे. जिल्ह्यातील सर्व प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा, क्रीडा संस्था, आदिवासी विकास प्रकल्पातील शाळा तसेच विविध क्रीडा मंडळांनी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना या शिबिरांचा लाभ घेण्यासाठी प्रोत्साहित करावे, असे आवाहन क्रीडा विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. सहभागी विद्यार्थ्यांची नावे, संपर्क क्रमांक व पत्ता जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जळगाव येथे पाठवावीत. अधिक माहितीसाठी मिनल थोरात (राज्य क्रीडा मार्गदर्शक – खो-खो) – ८६२५९४६७०९ व चंचल माळी (राज्य क्रीडा मार्गदर्शक – योगा) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी जगदीश चौधरी यांनी केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर