आयपीएल 2026: राजस्थान रॉयल्स 6 विकेट्सने विजयी, पंजाबचा पहिलाच पराभव
चंदीगड, 29 एप्रिल (हिं.स.) : यशस्वी जैस्वालचे अर्धशतक, त्यानंतर डोनोव्हान फरेरा आणि प्रभावी खेळाडू शुभम दुबे यांच्यातील शानदार भागीदारीच्या जोरावर राजस्थान रॉयल्सने पंजाब किंग्सवर सहा विकेट्स राखून विजय मिळवला. अशाप्रकारे राजस्थानने आयपीएल २०२६ मधी
राजस्थान रॉयस्सचा संघ


चंदीगड, 29 एप्रिल (हिं.स.) : यशस्वी जैस्वालचे अर्धशतक, त्यानंतर डोनोव्हान फरेरा आणि प्रभावी खेळाडू शुभम दुबे यांच्यातील शानदार भागीदारीच्या जोरावर राजस्थान रॉयल्सने पंजाब किंग्सवर सहा विकेट्स राखून विजय मिळवला. अशाप्रकारे राजस्थानने आयपीएल २०२६ मधील पंजाब किंग्सची अपराजित मालिका संपुष्टात आणली. प्रथम फलंदाजी करताना पंजाबने २० षटकांत चार विकेट्स गमावून २२२ धावा केल्या. प्रत्युत्तरात, यशस्वी आणि फरेरा यांच्या अर्धशतकांच्या आणि शुभमच्या शानदार योगदानाच्या जोरावर राजस्थानने १९.२ षटकांत चार गडी गमावून २२८ धावा करत सामना जिंकला.यामुळे आयपीएल २०२६ च्या गुणतालिकेत लक्षणीय बदल झाला आणि राजस्थान रॉयल्सला मोठा फायदा मिळाला आहे.

राजस्थानकडून फरेराने सहा चौकार आणि तीन षटकारांच्या मदतीने २६ चेंडूंमध्ये नाबाद ५२ धावा केल्या, तर यशस्वीने सात चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने २७ चेंडूंमध्ये ५१ धावा केल्या. शुभमने तीन चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने १२ चेंडूंमध्ये नाबाद ३१ धावा केल्या. शुभम आणि फरेरा यांनी पाचव्या विकेटसाठी ७७ धावांची नाबाद भागीदारी केली. पंजाबकडून युझवेंद्र चहलने तीन विकेट्स घेतल्या, तर अर्शदीप सिंगला एक विकेट मिळाली.

तत्पूर्वी, न्यू चंदीगडच्या मैदानावर प्रथम फलंदाजी करताना, पंजाब किंग्सच्या प्रभसिमरन सिंगने ४४ चेंडूंमध्ये सहा चौकार आणि एका षटकारासह ५९ धावा ठोकल्या. प्रियांश आर्यानेही ११ चेंडूंमध्ये पाच चौकार आणि एका षटकारासह २९ धावांची वेगवान खेळी केली. त्यानंतर, कूपर कॉनोलीने १४ चेंडूंमध्ये तीन षटकारांसह ३० धावा केल्या. श्रेयस अय्यरचा वेग थोडा मंदावला आणि त्याने २७ चेंडूंमध्ये एक चौकार आणि एका षटकारासह ३० धावा केल्या. मात्र, अखेरीस मार्कस स्टोइनिसच्या बॅटने धुमाकूळ घातला आणि २२ चेंडूंमध्ये चार चौकार व सहा षटकारांसह नाबाद ६२ धावांची धडाकेबाज खेळी केली. त्याने शेवटच्या षटकातही दोन षटकार आणि तीन चौकारांसह २४ धावा ठोकल्या. यामुळे प्रथम फलंदाजी करणाऱ्या पंजाबला २० षटकांत चार गडी गमावून २२२ धावांपर्यंत मजल मारता आली.

आठ सामन्यांमधील पंजाबचा हा पहिला पराभव आहे. त्यांनी सहा सामने जिंकले असून, एक सामना पावसामुळे रद्द झाला आहे. या पराभवानंतरही पंजाब १३ गुणांसह गुणतालिकेत अव्वल स्थानी कायम आहे. दरम्यान, राजस्थान नऊ सामन्यांतून १२ गुणांसह तिसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळूर दुसऱ्या क्रमांकावर आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे


 rajesh pande