
कोलंबो, 29 एप्रिल (हिं.स.)श्रीलंका क्रिकेट बोर्डमध्ये मोठी उलथापालथ झाली आहे. दीर्घकाळ एसएलसीचे अध्यक्ष राहिलेले शम्मी सिल्वा यांनी अचानक आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. मंडळाने बुधवारी ही घोषणा केली. राष्ट्रपती अनुरा कुमार दिसानायके यांनी मंडळात बदल करण्याचा आग्रह धरल्यामुळे सिल्वा यांनी हा निर्णय घेतला. पूर्वी ठरल्याप्रमाणे शम्मी सिल्वा आणि संपूर्ण मंडळाने एकत्र राजीनामा दिला आहे. हे राजीनामे तात्काळ प्रभावाने लागू झाले असून, त्यामुळे एका अंतरिम मंडळाला पदभार स्वीकारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
एसएलसीने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे, श्रीलंका क्रिकेटचे अध्यक्ष शम्मी सिल्वा यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांच्यासोबतच, एसएलसी कार्यकारी समितीचे पदाधिकारी आणि सदस्यांनीही राजीनामा दिला आहे. हा निर्णय राष्ट्रपती अनुरा कुमार दिसानायके आणि माननीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री, सुनील कुमार गमागे यांना औपचारिकपणे कळवण्यात आला आहे.
२८ एप्रिल रोजी झालेल्या एसएलसी कार्यकारी समितीच्या बैठकीनंतर हे राजीनामे देण्यात आले आहेत. आता श्रीलंकन सरकार अंतरिम समिती मंडळाचे व्यवस्थापन करण्यासाठी माजी खासदार एरन विक्रमरत्ने यांची तात्पुरते प्रमुख म्हणून नियुक्ती करण्याची शक्यता आहे. सुधारणांना गती देण्यासाठी माजी क्रिकेटपटू सिदाथ वेट्टिमुनी आणि रोशन महानामा यांनाही नवीन व्यवस्थेत भूमिका दिल्या जाऊ शकतात. पण, कोणतीही अधिकृत माहिती जाहीर करण्यात आलेली नाही.
शम्मी सिल्वा यांनी फेब्रुवारी २०१९ मध्ये थिलंगा सुमाथिपाला यांची जागा घेत एसएलसी अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारला. सुमाथिपाला यांच्यावरही त्यांच्या कार्यकाळात भ्रष्टाचाराचे आरोप झाले होते. सुरुवातीला सिल्वा हे सुमाथिपाला यांच्या जवळचे मानले जात असले तरी, त्यांनी हळूहळू या पदावरील आपली पकड मजबूत केली आणि सलग चार वेळा अध्यक्ष म्हणून काम पाहिले, त्यापैकी तीन निवडणुका त्यांनी बिनविरोध जिंकल्या.
सात वर्षांच्या त्यांच्या कार्यकाळात, पुरुष आणि महिला संघांनी आशियाई चषक विजेतेपद पटकावले. पण सातत्यपूर्ण यशाची कमतरता होती. पुरुष संघाच्या क्रमवारीत मोठी घसरण झाली आणि २०२३ च्या एकदिवसीय विश्वचषकात संघाची कामगिरी निराशाजनक ठरली, ज्यात संघ नवव्या स्थानावर राहिला. याव्यतिरिक्त, ते २०२४ आणि २०२६ च्या टी२० विश्वचषकांमधून लवकरच बाहेर पडले, २०२६ चा टी२० विश्वचषक श्रीलंकेसोबत सह-आयोजित होता. या महिन्याच्या सुरुवातीला गॅरी कर्स्टन यांची पुरुष संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती होऊनही, नेतृत्वबदलाची मागणी सुरूच राहिली होती.
---------------
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे