माद्रिद ओपन २०२६ : अव्वल मानांकित आर्यना सबालेन्काचे आव्हान संपुष्टात
माद्रिद, 29 एप्रिल, (हिं.स.) - अमेरिकेची टेनिसपटू आणि जागतिक क्रमवारीत ३० व्या क्रमांकावर असलेल्या हेली बॅप्टिस्टने माद्रिद ओपन २०२६ मधील धक्कादायक निकालाची नोंद केली. तिने अव्वल मानांकित आर्यना सबालेन्काला महिला उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात परा
आर्यना सबलेन्का आणि हेली बॅप्टिस्ट


माद्रिद, 29 एप्रिल, (हिं.स.) - अमेरिकेची टेनिसपटू आणि जागतिक क्रमवारीत ३० व्या क्रमांकावर असलेल्या हेली बॅप्टिस्टने माद्रिद ओपन २०२६ मधील धक्कादायक निकालाची नोंद केली. तिने अव्वल मानांकित आर्यना सबालेन्काला महिला उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात पराभूत केले. अडीच तास चाललेल्या सामन्यात बॅप्टिस्टने सबालेन्कावर २-६, ६-२, ७-६ (८-६) असा निसटता विजय मिळवला.

पहिला सेट सहज गमावल्यानंतर सहा मॅच पॉईंट्सवर मात करत तिने जोरदार पुनरागमन केले. चार वेळा ग्रँडस्लॅम चॅम्पियन असलेल्या सबालेन्काने आक्रमक बेसलाइन खेळाने जोरदार सुरुवात केली आणि बॅप्टिस्टची दोनदा सर्व्हिस ब्रेक करत पहिला सेट ६-२ ने जिंकला. सरळ सेटमध्ये विजय मिळवण्यासाठी प्रयत्न करत असताना बेलारूसच्या टेनिसपटूचे सामन्यावर पूर्ण नियंत्रण दिसत होते. पण, दुसऱ्या सेटमध्ये बॅप्टिस्टने सामन्याची दिशा बदलली, सबालेन्काची तीन वेळा सर्व्हिस ब्रेक करून सामना ६-२ असा बरोबरीत आणला आणि निर्णायक सेट खेळण्यास भाग पाडले.

तिसरा सेट एक रोमांचक लढत ठरला, ज्यात सबालेन्काने ५-४ अशा स्थितीत पाच मॅच पॉईंट्स मिळवले, पण बॅप्टिस्टने दबावाखाली आपला खेळ कायम ठेवला. अमेरिकन टेनिसपटूने लांबलेल्या रॅलीज आणि महत्त्वाच्या ब्रेक पॉईंट्समध्ये चिवटपणा दाखवत सामना टाय-ब्रेकमध्ये नेला. टाय-ब्रेकमध्ये, सबालेन्काने पुन्हा ६-५ अशा स्थितीत मॅच पॉईंट मिळवला, पण बॅप्टिस्टने सलग तीन पॉईंट्स मिळवून एक जबरदस्त पुनरागमन विजय पूर्ण केला आणि जागतिक क्रमवारीत अव्वल असलेल्या टेनिसपटूला १६ सामन्यांमधील पहिला पराभव पत्करायला लावला.

महिला एकेरीच्या सामन्यात अव्वल पाच मानांकित टेनिसपटूंविरुद्धचा हा तिचा पहिलाच विजय होता. ती पहिल्यांदाच डब्ल्यूटीए 1000 स्पर्धेच्या उपांत्य फेरीतही खेळणार आहे. तिचा सामना आता जागतिक क्रमवारीत नवव्या क्रमांकावर असलेल्या मिर्रा आंद्रीयेवाशी होणार आहे. आंद्रीयेवाने दुसऱ्या उपांत्यपूर्व फेरीत लेलाह फर्नांडिसचा ७-६ (७-१), ६-३ असा पराभव केला आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे


 rajesh pande