
सोलापूर, 30 एप्रिल (हिं.स.)।सोलापूर जिल्हा परिषदेच्या दिव्यांग सक्षमीकरण विभागाच्या जिल्हा दिव्यांग अधिकारी पदाचा अतिरिक्त पदभार योजना शिक्षणाधिकारी सुलभा वठारे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.
सध्या ‘मुख्यमंत्री समृद्ध ग्राम अभियान’ अंतर्गत गुणवत्ता तपासणीची प्रक्रिया सुरू असून, सोलापूर जिल्ह्यातील गावांची पाहणी करण्यासाठी लातूर जिल्हा परिषदेचे पथक येणार आहे. त्याचप्रमाणे सोलापूर जिल्ह्याचे पथक लातूर जिल्ह्यात तपासणीसाठी जाणार आहे.
या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी सूर्यकांत भुजबळ यांच्यावर मोठी जबाबदारी आली आहे. त्यामुळे अतिरिक्त पदभार सांभाळणे शक्य नसल्याने त्यांनी जिल्हा दिव्यांग सक्षम अधिकारी पदाच्या जबाबदारीतून मुक्त करण्याचा प्रस्ताव मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांच्याकडे सादर केला होता.
मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांनी हा प्रस्ताव मान्य करून भुजबळ यांना या पदभारातून मुक्त केले असून, जिल्हा दिव्यांग कल्याण अधिकारी पदाचा अतिरिक्त पदभार सुलभा वठारे यांच्याकडे देण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, सुलभा वठारे सध्या रजेवर असून त्या सोमवारी पदभार स्वीकारतील, अशी माहिती देण्यात आली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड