
परभणी, 30 एप्रिल (हिं.स.)।
शेतकऱ्यांचे हक्काचे माहमंडळ अशी ओळख असलेल्या महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ (महाबीज) ने आपल्या यशस्वी वाटचालीची 50 वर्ष पूर्ण केली आहेत. या सुवर्ण महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून परभणी येथील विभागीय व जिल्हा कार्यालयात वर्धापन दिन सोहळा पार पडला. अर्ध्या शतकाचा हा प्रवास केवळ व्यवसायिक नसून तो शेतकऱ्यांच्या विश्वासाचा आणि प्रगतीचा प्रवास असल्याचे या सोहळ्यातून अधोरेखित झाले.
तज्ञांचे मार्गदर्शन : तंत्रज्ञानाशी जोडली जाणार शेती
कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. के. एस. बेग, संशोधन संचालक, व.ना.म.कृ.वि. परभणी यांनी आपल्या भाषणात बदलत्या हवामानानुसार बियाणे संशोधनाचे महत्त्व अधोरेखित केले. त्यांनी शेतकऱ्यांना विविध पिकांच्या नवीन वाणांची माहिती देऊन बियाणे उत्पादनातून आर्थिक प्रगती कशी साधता येईल, याचे सखोल मार्गदर्शन केले. जिल्हा बियाणे प्रमाणीकरण अधिकारी शरद कदम यांनी जिल्हा बियाणे प्रमाणीकरण यंत्रणेच्या पारदर्शक कार्यप्रणालीबद्दल तसेच बियाणे पात्र होण्यासाठी घ्यावयाची काळजी आणि आवश्यक कागदपत्रे जतन करण्याबाबत मार्गदर्शन केले.
महाबीजचा सुवर्ण प्रवास : प्रगतीचा आढावा
विभागीय व्यवस्थापक जे. आर. खोकड, महाबीज परभणी यांनी महाबीजच्या 50 वर्षांच्या कारकिर्दीतील कामकाजाचा उहापोह करत प्रगतीची माहिती दिली. बियाणे उत्पादन, विपणन, प्रक्रिया, गुणवत्ता नियंत्रण यांसह जैविक खते, जैविक बुरशीनाशके, भाभा अनुसंधान केंद्र, मुंबई येथील तंत्रज्ञानावर आधारित उत्पादने, अतिसूक्ष्म निंबोळी पावडर, डिकम्पोझर, कर्बमापक किट याविषयी विस्तृत माहिती देण्यात आली.
शेतकरी, कर्मचारी, कामगार, विक्रेते यांचा गौरव
या ऐतिहासिक सोहळ्याचे औचित्य साधून उत्कृष्ट काम करणाऱ्या बियाणे उत्पादक शेतकऱ्यांचा, भागधारकांचा आणि यशस्वी विक्रेत्यांचा मान्यवरांच्या हस्ते सुवर्ण सन्मान करण्यात आला. तसेच महाबीजच्या प्रगतीत योगदान देणाऱ्या कर्मचाऱ्यांचेही कौतुक करण्यात आले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला जिल्हा व्यवस्थापक आर. एम. शेख यांनी महाबीजच्या स्थापनेपासूनच्या संघर्षाची आणि यशाची गाथा प्रस्तावनेत मांडली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कृषी क्षेत्र अधिकारी एफ. आर. आडे, व कनिष्ठ प्रक्रिया सहाय्यक दिपाली लोखंडे, यांनी केले, तर आभार कनिष्ठ प्रक्रिया सहाय्यक अरुणा एकाडे, यांनी मानले. यावेळी जेष्ठ भागधारक शेषेराव चापके (कातनेश्वर) आणि शेतकरी नेते हेमराज शिंदे (रावराजूर) यांनी महाबीजच्या बियाणे गुणवत्तेचे तसेच कामकाजाचे कौतुक केले.
या कार्यक्रमास महाबीजचे बियाणे उत्पादक, शेतकरी, विक्रेते, भागधारक तसेच वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सदर 50 व्या वर्धापन दिन कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विविध अधिकारी व कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis