
पणजी, 30 एप्रिल (हिं.स.) : देशातील प्रमुख शहरांमध्ये ५जी सेवेचा विस्तार केल्यानंतर अग्रगण्य दूरसंचार कंपनी ‘वी’ने आता गोव्यात 5-जी सेवा सुरू केली आहे. यामुळे कंपनीचा राज्यात औपचारिक प्रवेश झाला असून, 5-जी नेटवर्क अधिक मजबूत करण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल टाकले गेले आहे.
गोव्यासारख्या प्रमुख पर्यटनस्थळात वर्षभर स्थानिक नागरिक आणि पर्यटकांकडून मोठ्या प्रमाणावर डेटाचा वापर होत असल्याने, ‘वी’ने डेटा वापर जास्त असलेली ठिकाणे, गर्दीची क्षेत्रे आणि वेगाने विकसित होणाऱ्या शहरी भागांना प्राधान्य दिले आहे. कंपनीचा उद्देश 5-जी सेवेच्या माध्यमातून राज्यभर कनेक्टिव्हिटी सुधारण्याचा असून, वेगवान इंटरनेट आणि संबंधित सेवांची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी हे विशेष नेटवर्क उभारले जात आहे. विशेषतः पर्यटनस्थळे, व्यावसायिक केंद्रे आणि गर्दीच्या भागांमध्ये अखंड व दर्जेदार नेटवर्क अनुभव देण्यावर कंपनीचा भर आहे.
या विस्ताराबाबत बोलताना वोडाफोन आयडियाचे क्लस्टरचे महाराष्ट्र आणि गोवा बिझनेस हेड आनंद दाणी म्हणाले की, “आम्ही प्रमुख बाजारपेठांमध्ये आमची उपस्थिती अधिक मजबूत करत आहोत. गोव्यात 5-जी नेटवर्कचा वेगाने विस्तार करणे हे आमच्या योजनेतील महत्त्वाचे पाऊल आहे. डेटा वापर जास्त असलेली ठिकाणे, गर्दीची क्षेत्रे आणि प्रमुख पर्यटन व व्यावसायिक केंद्रांना प्राधान्य देऊन आम्ही नेटवर्कचा विस्तार करत आहोत, ज्यामुळे ग्राहकांना सातत्यपूर्ण आणि उत्तम सेवा अनुभव मिळेल.”
----------------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis