
छत्रपती संभाजीनगर, ४ एप्रिल (हिं.स.) : केंद्र शासनाच्या निर्देशानुसार छत्रपती संभाजीनगर शहरात महाराष्ट्र दिनापासून (१ मे) जनगणनेचे काम सुरू करण्यात येणार आहे. या मोहिमेसाठी महापालिकेचे सुमारे ३,८०० कर्मचारी नियुक्त करण्यात आले असून, त्यांचे प्रशिक्षण सध्या सुरू आहे. विशेष म्हणजे, यंदाची जनगणना पूर्णपणे डिजिटल पद्धतीने केली जाणार आहे.
जनगणनेचा पहिला टप्पा एक महिन्याचा असेल. या कालावधीत शहरातील घरांची मोजणी केली जाणार आहे. पहिल्या १५ दिवसांत नागरिकांना शासनाच्या अॅपच्या माध्यमातून स्वतः नोंदणी करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. १ ते १५ मेदरम्यान नागरिकांनी आवश्यक माहिती भरून नोंदणी करावी लागणार आहे.
या मोहिमेचे नेतृत्व महापालिकेचे उपायुक्त विकास नवाळे करत असून, त्यांच्याच मार्गदर्शनाखाली संपूर्ण प्रक्रिया राबवली जाणार आहे. त्यानंतर नियुक्त कर्मचारी घरोघरी जाऊन घरांना क्रमांक देण्याचे काम करतील.
शहरात जनगणनेसाठी १० ब्लॉक तयार करण्यात आले आहेत. प्रत्येक ब्लॉकमध्ये अंदाजे १२० ते १४० घरांचा समावेश असेल. शासनाकडून उपलब्ध करून दिलेल्या अॅपमध्ये एकूण ३३ प्रश्न असतील, ज्यांची उत्तरे नागरिकांना द्यावी लागतील.
जनगणनेच्या कामासाठी सुमारे साडेतीन हजार कर्मचाऱ्यांची आवश्यकता असताना, खबरदारी म्हणून १० टक्के अतिरिक्त कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. त्यामुळे एकूण कर्मचाऱ्यांची संख्या ३,८०० पर्यंत पोहोचली आहे.-----------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis