ठाणे - कशेळीत इमारतींमधील रहिवाशांवर कारवाईचे संकट
ठाणे, 04 एप्रिल (हिं.स.)। बोगस कागदपत्रे तयार करून विकासकांनी उभारलेल्या इमारतींमधील हजारो रहिवाशांवर कारवाईची टांगती तलवार उभी राहिली आहे. या प्रकरणी संबंधित विकासकांवर गुन्हे दाखल करून रहिवाशांना दिलासा देण्याचे निर्देश आमदार संजय केळकर यांनी एम
Thane


ठाणे, 04 एप्रिल (हिं.स.)।

बोगस कागदपत्रे तयार करून विकासकांनी उभारलेल्या इमारतींमधील हजारो रहिवाशांवर कारवाईची टांगती तलवार उभी राहिली आहे. या प्रकरणी संबंधित विकासकांवर गुन्हे दाखल करून रहिवाशांना दिलासा देण्याचे निर्देश आमदार संजय केळकर यांनी एमएमआरडीए अधिकाऱ्यांना दिले आहेत.

कशेळी भागात विकासकांनी एमएमआरडीएची खोटी कागदपत्रे तयार करून इमारती उभारल्या असून यात हजारो रहिवासी राहत आहेत. बनावट कागदपत्रे बनवून बँकेची कर्जेही मिळवून देण्यात आली आहेत. मात्र आता एमएमआरडीएने कागदपत्रे सादर करण्याबाबत रहिवाशांना नोटीसा बजावल्या आहेत. तर ना हरकत प्रमाणपत्रे देण्यास विकासकही टाळाटाळ करत असल्याने रहिवाशांवर कारवाईची टांगती तलवार उभी राहिली आहे.

या रहिवाशांनी ठाण्यात खोपट येथील भाजपच्या कार्यालयात आयोजित जनसेवकाचा जनसंवाद या कार्यक्रमात आमदार संजय केळकर यांची भेट घेऊन व्यथा मांडली. यावेळी श्री.केळकर यांनी तत्काळ एमएमआरडीए अधिकाऱ्यांना फोन करून रहिवाशांची बाजू भक्कमपणे मांडली. विकासकांनी बोगस कागदपत्रे तयार करून गृहकर्जे मिळवून दिली. सर्वसामान्य नागरिकांचा यात कोणताही दोष नसून एमएमआरडीएची बोगस कागदपत्रे बनवणाऱ्या विकासकांवर गुन्हे दाखल करा, असे स्पष्ट निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले.

या कार्यक्रमात ठाण्यात राहणाऱ्या धाराशिव येथील शेतकऱ्याने आमदार केळकर यांची भेट घेतली. शेतीचा बंधारा तुटून शेतीचे नुकसान झाले, परंतु प्रांत अधिकाऱ्यांनी तहसीलदारांना निर्देश देऊनही गेली आठ महिने त्याची पाहणी महसूल विभागाकडून झालेली नसल्याने मदतीपासून वंचित असल्याचे या शेतकऱ्याने निवेदनातून निदर्शनास आणले. यावेळी श्री.केळकर यांनी तत्काळ संबंधित तहसीलदारांना फोन करून स्पष्ट सूचना दिल्या. यावेळी तहसीलदारांनी सात दिवसांत पाहणी करून नुकसान भरपाईबाबत प्रक्रिया सुरू करण्याचे मान्य केले.

मेडोज येथे इमारतींजवळ बंदिस्त नसलेल्या नाल्यामुळे रहिवाशांचे आरोग्य धोक्यात आले आहे. याबाबतचे निवेदन येथील रहिवाशांनी दिले. श्री.केळकर यांनी संबंधित अधिकाऱ्यांशी तत्काळ संपर्क साधून चर्चा केली. या भागाची दोन दिवसांत अधिकाऱ्यांसोबत पाहणी करणार असून नाला बंदिस्त करण्याबाबतचा प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिल्याचे श्री.केळकर यांनी माध्यमांना सांगितले.

या कार्यक्रमात कंत्राटी कामगारांच्या समस्या, वारसा हक्क प्रकरणे आणि विविध सरकारी, निमसरकारी विभागाशी संबंधित समस्यांची निवेदने प्राप्त झाली. यावेळी माजी उपमहापौर अशोक भोईर, ऍड. सुभाष काळे, नगरसेवक विकास पाटील, नगरसेविका कमल चौधरी, किशोर मसुरकर, राजेश गाडे, उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर


 rajesh pande