
तेहरान, 05 एप्रिल (हिं.स.)।इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांनी संयुक्त राष्ट्रांचे महासचिव अँटोनियो गुटेरेस यांना पत्र लिहून तेहरानमधील बुशहर अणुऊर्जा प्रकल्पावर झालेल्या हल्ल्याबाबत गंभीर चिंता व्यक्त केली आहे. या हल्ल्यामुळे किरणोत्सर्ग (रेडिएशन) पसरण्याचा धोका निर्माण झाल्याचे त्यांनी म्हटले आहे.
यूएन महासचिवांना लिहिलेल्या पत्रात अराघची म्हणाले, “बुशहर अणुऊर्जा प्रकल्पाच्या परिसरावर हल्लेखोरांकडून वारंवार केले जाणारे हल्ले अत्यंत चिंताजनक आहेत. यामुळे संपूर्ण प्रदेशात किरणोत्सर्गीय प्रदूषणाचा गंभीर धोका निर्माण झाला असून त्याचे मानवी तसेच पर्यावरणीय दृष्टिकोनातून गंभीर परिणाम होऊ शकतात.”
पत्रात त्यांनी नमूद केले की, देशातील एकमेव कार्यरत अणुऊर्जा प्रकल्पाच्या आसपास सातत्याने होणाऱ्या हल्ल्यांमुळे व्यापक क्षेत्रासाठी गंभीर मानवी आणि पर्यावरणीय संकट निर्माण झाले आहे. सक्रिय बुशहर प्रकल्पाजवळ वारंवार होणाऱ्या हल्ल्यांमुळे “असह्य परिस्थिती” निर्माण झाली असून, कोणत्याही प्रकारचा किरणोत्सर्ग गळती (रेडिएशन लीक) झाल्यास त्याचे परिणाम इराणच्या सीमांपलीकडेही गंभीर ठरू शकतात, असा इशाराही त्यांनी दिला.
अराघची यांनी सांगितले की बुशहर प्रकल्पावर आतापर्यंत चार वेळा हल्ले झाले आहेत. रेडिएशन पसरल्यास तेहरानपेक्षा खाडी सहकार्य परिषदेच्या (GCC) देशांच्या राजधानींना अधिक धोका निर्माण होऊ शकतो, असा दावा त्यांनी केला.
आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्था (IAEA) ने सांगितले की, इराणने त्यांना कळवले आहे की शनिवारी सकाळी बुशहर प्रकल्प परिसराच्या जवळ एक क्षेपणास्त्र कोसळले. गेल्या काही आठवड्यांतील ही चौथी अशी घटना असल्याचे संस्थेने म्हटले आहे. संयुक्त राष्ट्रांच्या अणुनिगराणी संस्थेनुसार सध्या किरणोत्सर्गाच्या पातळीत कोणतीही वाढ झालेली नाही.
आयएईएचे महासंचालक राफेल ग्रॉसी यांनी या घटनेबाबत तीव्र चिंता व्यक्त करत सांगितले की, अणुऊर्जा प्रकल्प आणि त्याच्या आसपासच्या भागांवर कधीही हल्ले केले जाऊ नयेत, कारण सहाय्यक संरचनांमध्ये महत्त्वाची सुरक्षा उपकरणे असू शकतात. त्यांनी लष्करी संयम राखण्याचे आवाहन पुन्हा केले आणि संघर्षाच्या काळात अणुसुरक्षेसाठी संस्थेने निर्धारित केलेल्या सात मूलभूत तत्त्वांचे पालन करण्याचे महत्त्व अधोरेखित केले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode