मार्च महिन्यात पॅसेंजर व्हेईकल विक्रीत वाढ; मारुती सुझुकी अव्वल, टाटा मोटर्स दुसऱ्या स्थानावर
मुंबई, 05 एप्रिल (हिं.स.)। भारताच्या वाहन बाजारात मार्च २०२६ महिन्यात पॅसेंजर व्हेईकल (पीव्ही) विक्रीत लक्षणीय वाढ नोंदवली गेली असून बहुतांश कार उत्पादक कंपन्यांनी मागील वर्षाच्या तुलनेत अधिक विक्री साध्य केली आहे. देशातील आघाडीची कार निर्माता मारु
Rise in Passenger Vehicle Sales in March


मुंबई, 05 एप्रिल (हिं.स.)। भारताच्या वाहन बाजारात मार्च २०२६ महिन्यात पॅसेंजर व्हेईकल (पीव्ही) विक्रीत लक्षणीय वाढ नोंदवली गेली असून बहुतांश कार उत्पादक कंपन्यांनी मागील वर्षाच्या तुलनेत अधिक विक्री साध्य केली आहे. देशातील आघाडीची कार निर्माता मारुती सुझुकी कंपनीने आपले अव्वल स्थान कायम राखले आहे, तर दुसऱ्या स्थानासाठी झालेल्या स्पर्धेत टाटा मोटर्सने महिंद्रा आणि महिंद्राला मागे टाकत मोठी झेप घेतली आहे. दरम्यान, ह्युंदाई मोटर इंडिया, स्कोडा ऑटो आणि होंडा कार्स इंडिया यांनी सिंगल डिजिट वाढ नोंदवली असली तरी रेनॉल्ट इंडिया आणि निसान मोटर इंडिया यांनी सर्वाधिक टक्केवारी वाढ साधली आहे.

मार्च २०२६ मध्ये मारुती सुझुकीने १,६९,४२८ युनिट्सची देशांतर्गत विक्री नोंदवली असून ही वाढ मागील वर्षाच्या तुलनेत सुमारे १०.२७ टक्के आहे. कंपनीच्या कॉम्पॅक्ट सेगमेंटमध्ये मारुती सुझुकी बलेनो, मारुती सुझुकी स्विफ्ट, मारुती सुझुकी डिझायर,मारुती सुझुकी वॅगन आर आणि मारुती सुझुकी सेलेरियो यांसारख्या मॉडेल्सचा मोठा वाटा असून या सेगमेंटमधून ७१,७८९ युनिट्सची विक्री झाली आहे. त्याचबरोबर एसयूव्ही सेगमेंटमध्ये मारुती सुझुकी ब्रेझा, मारुती सुझुकी ग्रँड विटारा, मारुती सुझुकी फ्रॉन्क्स आणि मारुती सुझुकी ई-विटारा यांच्या जोरावर ७१,३५६ युनिट्सची विक्री झाली आहे.

दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या टाटा मोटर्सने मार्च महिन्यात ६६,९७१ युनिट्सची विक्री केली असून ही वाढ मागील वर्षाच्या तुलनेत तब्बल २९ टक्के आहे. कंपनीच्या एसयूव्ही पोर्टफोलिओमधील टाटा नेक्सॉन आणि टाटा पंच यांसारख्या लोकप्रिय मॉडेल्समुळे ही वाढ साध्य झाली आहे. तसेच सीएनजी आणि इलेक्ट्रिक वाहनांच्या वाढत्या मागणीमुळे कंपनीच्या एकूण विक्रीत मोठी भर पडली आहे.

तिसऱ्या स्थानावर असलेल्या महिंद्रा आणि महिंद्राने मार्च २०२६ मध्ये ६०,२७२ युनिट्सची विक्री नोंदवली असून ही वाढ मागील वर्षाच्या तुलनेत २५ टक्के आहे. कंपनीच्या एसयूव्ही मॉडेल्समध्येमहिंद्रा स्कॉर्पिओ एन, महिंद्रा थार आणि महिंद्रा थार रॉक्स यांचा मोठा वाटा आहे. याशिवाय महिंद्रा XUV 7XO आणि महिंद्रा XEV 9S यांसारख्या नव्या मॉडेल्सच्या डिलिव्हरीलाही सुरुवात झाली आहे.

ह्युंदाई मोटर इंडियाने मार्च २०२६ मध्ये ५५,०६४ युनिट्सची विक्री केली असून ही वाढ ६.३ टक्के आहे. कंपनीच्या विक्रीत ह्युंदाई क्रेटा, ह्युंदाई व्हेन्यू आणि ह्युंदाई आय२० या मॉडेल्सचा मोठा वाटा आहे. तसेच ह्युंदाई वर्ना आणि ह्युंदाई एक्सटर यामध्ये करण्यात आलेल्या अपडेट्समुळे पुढील काळात मागणी वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

टोयोटा किर्लोस्कर मोटरने देखील मार्च महिन्यात ३५,१२५ युनिट्सची विक्री नोंदवली असून ही वाढ २३.८ टक्के आहे. कंपनीच्या टोयोटा इनोव्हा हायक्रॉस, टोयोटा अर्बन क्रूझर हायडर आणि टोयोटा फॉर्च्युनर या मॉडेल्समुळे विक्रीत वाढ झाली आहे. याशिवाय कंपनीने भारतासाठी आपली पहिली इलेक्ट्रिक कार टोयोटा अर्बन क्रूझर ईबेला सादर केली असून लवकरच तिच्या किंमती जाहीर होण्याची शक्यता आहे.

एकूणच, मार्च २०२६ मध्ये भारतीय ऑटोमोबाइल बाजारात एसयूव्ही आणि इलेक्ट्रिक वाहनांची वाढती मागणी ही प्रमुख चालक शक्ती ठरली असून आगामी काळातही ही वाढ कायम राहण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande