तेहरान हल्ल्यात अनेक इराणी लष्करी अधिकारी ठार, ट्रम्प यांचा दावा
वॉशिंग्टन , 05 एप्रिल (हिं.स.)।पश्चिम आशियातील सुरू असलेला संघर्ष दिवसेंदिवस अधिक तीव्र होत चालला आहे. अमेरिका आणि इस्रायलच्या तीव्र हल्ल्यांमुळे इराणही इस्रायल तसेच खाडी देशांतील अमेरिकन लष्करी तळांवर जोरदार प्रत्युत्तर देत आहे.या तणावपूर्ण परिस्थ
इराणची अमेरिकेला पाषाणयुगापेक्षाही मागच्या युगात पाठवण्याची उघडपणे धमकी


वॉशिंग्टन , 05 एप्रिल (हिं.स.)।पश्चिम आशियातील सुरू असलेला संघर्ष दिवसेंदिवस अधिक तीव्र होत चालला आहे. अमेरिका आणि इस्रायलच्या तीव्र हल्ल्यांमुळे इराणही इस्रायल तसेच खाडी देशांतील अमेरिकन लष्करी तळांवर जोरदार प्रत्युत्तर देत आहे.या तणावपूर्ण परिस्थितीत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मोठा दावा केला आहे. ट्रम्प यांनी म्हटले की, तेहरानमध्ये झालेल्या मोठ्या हल्ल्यात इराणचे अनेक लष्करी अधिकारी ठार झाले आहेत.

ट्रम्प यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘ट्रुथ सोशल’वरील पोस्टद्वारे ही माहिती दिली. या पोस्टमध्ये त्यांनी एक व्हिडिओही शेअर केला असून त्यात स्फोटांचे आवाज आणि लढाऊ विमानांची गर्जना ऐकू येते. मात्र, हा हल्ला नेमका कोणत्या ठिकाणी झाला आणि किती नुकसान झाले, याबाबत त्यांनी कोणतीही माहिती दिली नाही. तसेच इराणकडूनही या दाव्याची अद्याप अधिकृत पुष्टी करण्यात आलेली नाही. त्यामुळे या हल्ल्यात नेमके किती वरिष्ठ अधिकारी मारले गेले, हे स्पष्ट झालेले नाही.

पश्चिम आशियातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर आणि गेल्या काही आठवड्यांत वाढलेल्या लष्करी हालचालींच्या दरम्यान ट्रम्प यांचे हे वक्तव्य समोर आले आहे. याचवेळी त्यांनी इराणला कडक इशाराही दिला आहे. त्यांनी म्हटले की, इराणकडे ४८ तासांचा अवधी आहे—किंवा करार करा अथवा स्ट्रेट ऑफ होर्मुझ खुला करा; अन्यथा मोठ्या विध्वंसाला सामोरे जावे लागेल.

दुसरीकडे, ट्रम्प यांच्या या इशाऱ्याला इराणनेही जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. इराणच्या केंद्रीय लष्करी कमांडने अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा इशारा फेटाळून लावला आहे. इराणी जनरल अली अब्दोल्लाही अलीआबादी यांनी म्हटले की, ट्रम्प यांची ही धमकी हतबल, घाबरलेली, असंतुलित आणि मूर्खपणाची कृती आहे. त्यांनी इशारा देत म्हटले की, या संदेशाचा साधा अर्थ असा आहे की तुमच्यासाठी नरकाचे दरवाजे उघडतील.

यापूर्वी ट्रम्प यांनी इराणला १० दिवसांचा अल्टिमेटम दिला होता. २६ मार्च रोजी त्यांनी सांगितले होते की, चर्चेला संधी देण्यासाठी इराणच्या ऊर्जा ठिकाणांवरील हल्ले १० दिवसांसाठी थांबवण्यात आले आहेत. ट्रम्प यांच्या मते, हा निर्णय इराणच्या विनंतीवर घेण्यात आला होता आणि चर्चा सकारात्मक दिशेने सुरू होती.

गेल्या महिन्याहून अधिक काळ सुरू असलेल्या पश्चिम आशिया संघर्षामुळे अनेक जागतिक चिंतांना तोंड फुटले आहे. यामागील प्रमुख कारण म्हणजे होर्मुझ सामुद्रधुनी. जगातील तेल व्यापारासाठी हा मार्ग अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. याच मुद्द्यावरून अमेरिका सातत्याने इराणवर दबाव टाकत आहे. आता ट्रम्प यांचा नवीन ४८ तासांचा अल्टिमेटम या वादाला अधिक गंभीर बनवत असून परिस्थिती आणखी चिघळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande