
नवी दिल्ली, ६ एप्रिल (हिं.स,) : काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पश्चिम आशियातील सुरू असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर देशातील एलपीजीच्या तुटवड्यावरून सरकारवर टीका केली आहे. ते म्हणाले की, देशातील रोजंदारी मजुरांना सध्या स्वयंपाकाचा गॅस आवाक्याबाहेर गेला आहे.
'एक्स' या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून राहुल गांधी यांनी सरकारवर एलपीजीच्या संकटाला कोविड-१९ महामारीप्रमाणे वागवत असल्याचा आरोप केला. कोणतीही धोरणे नाहीत, केवळ मोठ्या घोषणा केल्या जात आहेत आणि संपूर्ण भार गरिबांवर टाकला जात आहे. ५०० ते ८०० रुपये रोजंदारीवर काम करणाऱ्या स्थलांतरित मजुरांना आता स्वयंपाकाचा गॅस आवाक्याबाहेर गेला आहे. रात्री घरी परतणाऱ्या मजुरांकडे चूल पेटवण्यासाठीही पैसे नसतात. परिणामी, मजुरांना शहरे सोडून आपल्या गावी परत जाण्यास भाग पाडले जात आहे.
ते म्हणाले की, कापड गिरण्या आणि कारखान्यांचा कणा असलेले मजूरच मोडले जात आहेत. वस्त्रोद्योग आधीच मोठ्या संकटात आहे आणि उत्पादन कोलमडत आहे. हे संकट आले कुठून? याचे कारण एक राजनैतिक चूक आहे, जी सरकार अजूनही मान्य करायला तयार नाही. विरोधी पक्षनेत्यांनी प्रश्न विचारला की प्रत्येक संकटात सर्वात आधी गरीबच का मरतात. हा केवळ गरिबांचा प्रश्न नाही, तर हा आपल्या सर्वांचा प्रश्न आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे