
नाशिक, 07 एप्रिल (हिं.स.)। अशोक खरात प्रकरणांमध्ये ईडी ने गुन्हा दाखल केल्यानंतर या प्रकरणाच्या तपासासाठी या विभागाचे विशेष पथक नाशिकमध्ये दाखल झाले असून मंगळवारी दाखल झालेल्या या पथकाकडून अधिकाऱ्यांशी प्राथमिक चर्चा करण्यात आली आहे त्यानंतर पुढील कारवाई केली जाणार आहे.
अध्यात्म आणि दैवी शक्तीच्या नावाखाली महिलांची फसवणूक करणाऱ्या भोंदू बाबा अशोक खरातच्या प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. सध्या अशोक खरात हा पोलीस कोठडीत आहे आणि त्याची कसून चौकशी सुरु आहे. अशोक खरातच्या पोलीस चौकशीदरम्यान प्रत्येक दिवशी नवीन आणि धक्कादायक माहिती समोर येत आहे.
दरम्यान, नाशिकमध्ये भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणाला आता मोठं वळण मिळालं असून आता या प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाची (ED) देखील एंट्री झाली आहे. EDचं पथक नाशिकमध्ये दाखल झालं आहे. माहितीनुसार, EDने 4 एप्रिल रोजी खरातविरोधात मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा दाखल केला आहे. त्यानंतर आता खरातच्या मालमत्तांची चौकशी करण्यावर भर दिला जात आहे. अशोक खरात च्या नावावर असलेल्या मालमत्तांचे कागदपत्र EDकडून तपासले जाणार आहेत. तपास यंत्रणांकडून आधीच खरातच्या मालमत्तांचा सविस्तर अहवाल तयार करण्यात आला असून त्या आधारे पुढील कारवाई केली जाण्याची शक्यता आहे. या प्रकरणात आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात अनेक बडे मासे गळाला लागण्याची शक्यता आहे.
दरम्यान या सर्व प्रकरणाची चौकशी करण्यासाठी दाखल झालेल्या ईडी पथकाने उपनिबंधक खरेदी विक्री आणि सध्या तपास करत असलेल्या एस आय टी पथकाच्या प्रमुखांशी चर्चा केली असल्याचे सांगितले जात असून त्यानुसार पुढील तपास केला जाणार आहे
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV