हिजबुल्लाहवर हल्ले सुरूच राहतील- बेंजामिन नेतन्याहू
जेरुसलेम , 08 एप्रिल (हिं.स.)।इराणसोबत दोन आठवड्यांच्या युद्धविराम करारानंतरही इस्रायलने स्पष्ट केले आहे की लेबनानमधील हिजबुल्लाविरोधातील त्यांची लष्करी कारवाई सुरूच राहणार आहे. इस्रायली सैन्याने बुधवारी जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, जमिनीव
हिजबुल्लाहवर हल्ले सुरूच राहतील- बेंजामिन नेतन्याहू


जेरुसलेम , 08 एप्रिल (हिं.स.)।इराणसोबत दोन आठवड्यांच्या युद्धविराम करारानंतरही इस्रायलने स्पष्ट केले आहे की लेबनानमधील हिजबुल्लाविरोधातील त्यांची लष्करी कारवाई सुरूच राहणार आहे. इस्रायली सैन्याने बुधवारी जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, जमिनीवरील तसेच हवाई मोहिमांद्वारे लढाई सुरू ठेवली जात आहे. पाकिस्तानच्या मध्यस्थीने अमेरिका, इराण आणि इस्रायल यांच्यात दोन आठवड्यांच्या युद्धविरामावर सहमती झाल्यानंतर हे वक्तव्य समोर आले आहे. मात्र, इस्रायलने स्पष्ट केले की हा करार केवळ इराणपुरता मर्यादित असून त्यात लेबनान किंवा हिजबुल्लाचा समावेश नाही.

पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या कार्यालयाकडून जारी निवेदनात म्हटले आहे की, इस्रायल अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या त्या निर्णयाचे समर्थन करते, ज्यामध्ये इराणविरुद्धची लष्करी कारवाई दोन आठवड्यांसाठी स्थगित करण्यात आली आहे. हा निर्णय या अटीवर आधारित आहे की इराणने तात्काळ होर्मुज सामुद्रधुनी जहाजवाहतुकीसाठी खुली करावी आणि अमेरिका, इस्रायल तसेच प्रादेशिक देशांवरील सर्व हल्ले थांबवावेत.

इस्रायलने पुन्हा एकदा स्पष्ट केले की लेबनानमधील हिजबुल्लाविरोधातील त्यांची कारवाई सुरू राहील. दक्षिण लेबनानमध्ये जमिनीवरील लष्करी मोहिमा तसेच इतर भागांमध्ये हवाई हल्ले सुरू असून, हिजबुल्लाची लष्करी क्षमता कमकुवत करणे आणि उत्तर इस्रायलवरील हल्ले रोखणे हा त्यामागील उद्देश असल्याचे सैन्याने सांगितले.

दरम्यान, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणविरुद्ध प्रस्तावित मोठ्या लष्करी कारवाईला सध्या स्थगिती देण्याची घोषणा केली आहे. त्यांनी सांगितले की, इराणने होर्मुज सामुद्रधुनी तात्काळ आणि सुरक्षितपणे खुली करण्यास सहमती दर्शवल्यास अमेरिका दोन आठवड्यांसाठी बॉम्बहल्ले आणि लष्करी कारवाया थांबवण्यास तयार आहे.

तेहरानमध्ये इराणच्या सर्वोच्च राष्ट्रीय सुरक्षा परिषदेनंही या तात्पुरत्या युद्धविरामाला मान्यता दिली आहे. इराणने संकेत दिले आहेत की, त्यांच्यावर हल्ले थांबले तर त्यांची लष्करी कारवाईही थांबवली जाईल. तसेच पुढील दोन आठवड्यांत अमेरिकेसोबत चर्चेसाठी ते तयार असल्याचेही इराणने स्पष्ट केले आहे.पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी अमेरिका आणि इराण या दोन्ही देशांना १० एप्रिल रोजी इस्लामाबाद येथे चर्चेसाठी आमंत्रित केले आहे, ज्यातून कायमस्वरूपी तोडगा काढण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

उल्लेखनीय म्हणजे, हा संघर्ष २८ फेब्रुवारी रोजी सुरू झाला होता, जेव्हा अमेरिकेने इराणच्या अणु कार्यक्रमाच्या मुद्द्यावर लष्करी कारवाई सुरू केली होती. सध्याचा तात्पुरता युद्धविराम हा प्रादेशिक तणाव कमी करण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल मानले जात असले, तरी इस्रायल-हिजबुल्ला आघाडीवरील परिस्थिती अद्याप अत्यंत संवेदनशील आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande