इराणला चर्चेसाठी तयार करण्यात पाकिस्तान नाहीतर चीनची महत्त्वाची भूमिका
वॉशिंग्टन , 08 एप्रिल (हिं.स.)।अमेरिका आणि इराण यांच्यात वाढत चाललेला तणाव विनाशकारी युद्धाच्या दिशेने जात असल्याचे चित्र असतानाच अचानक दोन आठवड्यांच्या युद्धविरामात बदलला. एका बाजूला अमेरिकेने या कराराचे श्रेय पाकिस्तानला दिले, तर अहवालानुसार पाकि
ट्रम्प यांची इराणसोबत दोन आठवड्यांच्या युद्धविरामाची घोषणा


वॉशिंग्टन , 08 एप्रिल (हिं.स.)।अमेरिका आणि इराण यांच्यात वाढत चाललेला तणाव विनाशकारी युद्धाच्या दिशेने जात असल्याचे चित्र असतानाच अचानक दोन आठवड्यांच्या युद्धविरामात बदलला. एका बाजूला अमेरिकेने या कराराचे श्रेय पाकिस्तानला दिले, तर अहवालानुसार पाकिस्तानने केवळ मध्यस्थाची भूमिका निभावली होती. प्रत्यक्षात इराणला युद्धविरामासाठी तयार करण्यात चीन हा खरा महत्त्वाचा खेळाडू ठरल्याचे समोर आले आहे. इराणचा सर्वात मोठा व्यापारी भागीदार असलेल्या चीनने तेहरानला अमेरिकेसोबत युद्धविरामाच्या दिशेने पुढे जाण्यास प्रोत्साहन दिले.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही अखेर मान्य केले की,तेहरानला चर्चेच्या टेबलावर आणण्यात चीनची महत्त्वाची भूमिका होती. माध्यमांनी ट्रम्प यांना विचारले की, इराणला युद्धविरामासाठी तयार करण्यात चीनचा सहभाग होता का, यावर त्यांनी उत्तर दिले, “मला तसे ऐकायला मिळाले आहे.” यापूर्वी ट्रम्प यांनी इराणला इशारा देत म्हटले होते की, करार झाला नाही तर आज रात्री एक संपूर्ण सभ्यता नष्ट होईल. मात्र, हल्ल्याची अंतिम मुदत संपण्याच्या अवघ्या ९० मिनिटे आधी त्यांनी आपला निर्णय बदलत युद्धविरामाची घोषणा केली.

महिनाभर चाललेल्या या युद्धादरम्यान चीन उघडपणे इराणच्या समर्थनात उभा राहिला. मात्र, चीनने सार्वजनिक वक्तव्यांपेक्षा कूटनीतिक रणनीतीवर अधिक भर दिला. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प ज्या पाकिस्तानला युद्धविरामाचे श्रेय देत आहेत, त्याच पाकिस्तानने या महिन्याच्या सुरुवातीला चीनकडे मदतीसाठी संपर्क साधल्याचे सांगितले जाते. अहवालानुसार, चीनने पाकिस्तान, तुर्किये आणि इजिप्तसारख्या मध्यस्थ देशांसोबत मिळून इराण युद्ध थांबवण्याची रणनीती आखली. इतकेच नव्हे तर युद्धविरामाच्या घोषणेच्या काही तास आधी चीन आणि रशियाने संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत (यूएनएससी) होर्मुज सामुद्रधुनी पुन्हा खुली करण्यासाठी बलप्रयोगास मंजुरी देणाऱ्या प्रस्तावावर व्हेटो केला.

युद्धविरामातील आपल्या भूमिकेबाबत चीनकडून अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. दरम्यान, पाकिस्तानी पंतप्रधान शहबाज शरीफ अमेरिकन राष्ट्राध्यक्षांच्या कौतुकाचा आधार घेत स्वतःचे श्रेय मिरवताना दिसत आहेत. मात्र, त्यांच्या एका सोशल मीडिया पोस्टमुळे युद्धविरामातील त्यांच्या भूमिकेबाबत संशय निर्माण झाला आहे. या पोस्टमध्ये त्यांनी ट्रम्प यांना लष्करी कारवाईची मुदत दोन आठवड्यांनी पुढे ढकलण्याची विनंती केली होती. विशेष म्हणजे, या पोस्टच्या सुरुवातीला “ड्राफ्ट – पाकिस्तानच्या पंतप्रधानांचा एक्सवरील संदेश” असे लिहिलेले दिसल्याने हा मजकूर बाहेरील कोणत्या देशाने तयार केला असावा, अशी शंका व्यक्त केली जात आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande