
अहमदाबाद, 08 एप्रिल (हिं.स.)। राष्ट्रकुल क्रीडा महासंघाचे अध्यक्ष डॉ. डोनाल्ड रुकारे आणि मुख्य कार्यकारी अधिकारी केटी सॅडलियर यांच्या नेतृत्वाखालील एक उच्चस्तरीय राष्ट्रकुल क्रीडा शिष्टमंडळ चार दिवसांच्या अधिकृत दौऱ्यासाठी बुधवारी गुजरातमध्ये दाखल झाले. २०३० च्या शताब्दी राष्ट्रकुल खेळांसाठी अहमदाबादची यजमान शहर म्हणून निवड निश्चित झाल्यापासूनचा हा पहिला औपचारिक आढावा दौरा आहे.
गांधीनगर येथे झालेल्या सदिच्छा भेटीदरम्यान, शिष्टमंडळाने मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांना २३ जुलै ते २ ऑगस्ट दरम्यान होणाऱ्या आगामी ग्लासगो राष्ट्रकुल खेळांमध्ये उपस्थित राहण्यासाठी औपचारिक निमंत्रण दिले. मुख्यमंत्री पटेल यांनी हे निमंत्रण स्वीकारले आणि पुष्टी केली की, गुजरातचे एक उच्चस्तरीय शिष्टमंडळ स्कॉटलंडला भेट देईल, जिथे ते कार्यक्रमाचे नियोजन, रसद आणि संचालन यांचे प्रत्यक्ष निरीक्षण करून त्यातून मिळालेली माहिती २०३० च्या तयारीसाठी वापरता येईल.
८ एप्रिल ते ११ एप्रिल दरम्यान, भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या (IOA) पदाधिकाऱ्यांसोबत पाच सदस्यीय पथक गुजरातच्या सज्जतेचा व्यापक अभ्यास करेल. या पाहणी दौऱ्यात अहमदाबाद, गांधीनगर, वडोदरा आणि एकता नगर येथील प्रमुख ठिकाणांचा समावेश आहे, ज्यात नरेंद्र मोदी स्टेडियम आणि ईकेए एरिना (अहमदाबाद), वीर सावरकर क्रीडा संकुल, वडोदरा क्रिकेट स्टेडियम आणि स्टॅच्यू ऑफ युनिटी/एकता नगर येथील सुविधांचा समावेश आहे.
गुजरातच्या मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या 'कालमर्यादा, उच्च गुणवत्ता आणि प्रभावी नियोजन' या मंत्राच्या मार्गदर्शनाखाली, राज्य सरकार सांघिक प्रयत्नांतून शताब्दी राष्ट्रकुल खेळ २०३० यशस्वीपणे आयोजित करण्यास कटिबद्ध आहे.
२०३० चे राष्ट्रकुल खेळ हे शताब्दी राष्ट्रकुल खेळ असतील, यावर प्रकाश टाकत डॉ. रुकारे यांनी गुजरात आणि अहमदाबादला या स्पर्धेचे आयोजन करण्याची संधी मिळणे ही अत्यंत अभिमानाची बाब असल्याचे सांगितले. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदर्शी नेतृत्वाची आणि खेळांना दिलेल्या भक्कम प्रोत्साहनाची प्रशंसा केली.
“राष्ट्रकुल क्रीडा संघ आणि भारतीय ऑलिम्पिक संघटनेला मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिले की, २०३० च्या राष्ट्रकुल खेळांच्या यशस्वी आयोजनासाठी राज्य सरकार सर्व आवश्यक सुविधा आणि पायाभूत संरचना उपलब्ध करून देईल,” असे म्हटले आहे.
कॉमनवेल्थ स्पोर्ट टीमचे अध्यक्ष डॉ. डोनाल्ड रुकारे यांनी, गुजरातमध्ये होणारे शताब्दी कॉमनवेल्थ गेम्स २०३० हे सांस्कृतिक चैतन्य दर्शवणारा एक भव्य क्रीडा महोत्सव म्हणून उदयास यावेत, हे सुनिश्चित करण्यासाठी सामूहिक संघभावनेतून एकत्र काम करण्याची उत्सुकता व्यक्त केली.
---------------
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे