
नवी दिल्ली, ०८ एप्रिल (हिं.स.). भारतीय महिला हॉकी संघाच्या अर्जेंटिना दौऱ्यासाठी हॉकी इंडियाने 24 सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. हा दौरा 13 ते 17 एप्रिल 2026 दरम्यान भारतीय संघाचा हा दौरा असणार आहे. या दौऱ्यात भारत यजमानांविरुद्ध चार सामन्यांची मालिका खेळणार आहे. एफ. आय. एच. हॉकी विश्वचषक 2026 आणि आशियाई क्रीडा स्पर्धेच्या तयारीसाठी हा दौरा महत्त्वपूर्ण असणार आहे.
संघाकडे अनुभवी आणि तरुण हॉकपटूंचा चांगला समतोल आहे. आपल्या शांत स्वभावासाठी आणि उत्कृष्ट खेळासाठी ओळखल्या जाणाऱ्या मिडफिल्डर सलीमा टेटे यांनी पुन्हा एकदा संघाचे नेतृत्व केले आहे.
या दौऱ्यासाठी दुखापतीतून सावरल्यानंतर दीपिका संघात परतली आहे. तिच्या पुनरागमनामुळे पेनल्टी कॉर्नरवर संघ मजबूत होईल. तिच्या अनुपस्थितीत, नवनीत कौर, मनीषा चौहान, उदिता आणि अन्नू यांसारख्या हॉकीपटूंनी उत्कृष्ट कामगिरी केली होती.
अनुभवी सविताचे पुनरागमन हा संघासाठी दिलासा आहे. अलीकडील पात्रता स्पर्धेत तिच्या अनुपस्थितीत बिचू देवीने उत्कृष्ट कामगिरी करून तिची योग्यता सिद्ध केली होती. ज्योती आणि मुमताज खान यांचे बचावात पुनरागमन देखील संघाला आणखी मजबूती देणार आहे. त्याचबरोबर बलजित कौर, वैष्णवी फाळके, ऋतुजा पिसाल, इशिका आणि साक्षी राणा यांसारख्या युवा हॉकीपटूंवरही सर्वांचे लक्ष असेल.
संघ निवडीबाबत मुख्य प्रशिक्षक शोर्ड मारिन म्हणाले की, हॉकीपटूंना आंतरराष्ट्रीय अनुभव देण्यासाठी आणि संघ संयोजन मजबूत करण्यासाठी हा दौरा एक उत्तम संधी आहे. भारत आणि अर्जेंटिना यांच्यातील चार सामने 13,14,16 आणि 17 एप्रिल रोजी खेळले जाणार आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे