इराणकडून होर्मुजमधील जहाजांसाठी पर्यायी समुद्री मार्ग जाहीर
तेहरान , 09 एप्रिल (हिं.स.)।पश्चिम आशियात सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर आता होर्मुज सामुद्रधुनी संदर्भात एक मोठी घडामोड समोर आली आहे. माहितीनुसार, इराणने जहाजांच्या वाहतुकीसाठी पर्यायी समुद्री मार्गांची घोषणा केली असून, याचा जागतिक व्यापार
इराणकडून होर्मुजमधील जहाजांसाठी पर्यायी समुद्री मार्ग जाहीर


तेहरान , 09 एप्रिल (हिं.स.)।पश्चिम आशियात सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर आता होर्मुज सामुद्रधुनी संदर्भात एक मोठी घडामोड समोर आली आहे. माहितीनुसार, इराणने जहाजांच्या वाहतुकीसाठी पर्यायी समुद्री मार्गांची घोषणा केली असून, याचा जागतिक व्यापार आणि तेलपुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे.

इराणच्या इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्स (आयआरजीसी) च्या नौदलाने जारी केलेल्या निवेदनात सांगितले की, समुद्री सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देत हा निर्णय घेण्यात आला आहे. आयआरजीसी नौदलाने सर्व मालवाहू जहाजे आणि नौकांना नव्याने निश्चित केलेल्या मार्गांचे पालन करण्याचे निर्देश दिले आहेत. जहाजांची ये-जा आयआरजीसी नौदलाच्या कडक देखरेखीखाली केली जाईल, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

जगातील सुमारे २० टक्के तेल वाहतूक याच सामुद्रधुनीतून होत असल्याने सुरक्षेबाबत चिंता वाढल्या होत्या. दोन आठवड्यांच्या तात्पुरत्या युद्धविरामाचा भाग म्हणून होर्मुज सामुद्रधुनी तात्पुरती पुन्हा खुली करण्यात आली असून, त्याचाच एक भाग म्हणून इराणने हा निर्णय घेतला आहे.

प्रवेश मार्ग : ओमान समुद्रातून होर्मुज सामुद्रधुनीत प्रवेश करणारी जहाजे आता लारक बेटाच्या उत्तरेकडील भागातून प्रवास करतील. त्यानंतर ती पर्शियन आखाताच्या दिशेने पुढे जातील. संभाव्य धोक्यांपासून बचाव करत सुरक्षित प्रवेश मिळावा हा या मार्गाचा उद्देश आहे.

निर्गमन मार्ग : आखातातून बाहेर पडणाऱ्या जहाजांसाठीही नवीन मार्ग निश्चित करण्यात आला आहे. ही जहाजे लारक बेटाच्या दक्षिणेकडील भागातून ओमान समुद्राच्या दिशेने रवाना होतील.

इराणचे म्हणणे आहे की, या नव्या मार्गांचा उद्देश जहाजांना सुरक्षित आणि अखंड प्रवासाची सुविधा उपलब्ध करून देणे हा आहे. जलमार्गात कोणतीही अप्रिय घटना टाळणे आणि आंतरराष्ट्रीय नौवहन सुरळीत ठेवणे, या दिशेने हा एक महत्त्वाचा उपक्रम असल्याचेही इराणने स्पष्ट केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande