
वॉशिंग्टन , 09 एप्रिल (हिं.स.)। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला नवी धमकी दिली आहे. ट्रम्प यांनी म्हटले आहे की, जर इराणने होर्मुज सामुद्रधुनी खुली केली नाही आणि अण्वस्त्रे न ठेवण्याचे आश्वासन दिले नाही, तर गोळीबार सुरू होईल.
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘ट्रुथ’वर त्यांनी लिहिले, “अमेरिकेची सर्व जहाजे, विमाने आणि लष्करी कर्मचारी, तसेच अतिरिक्त दारुगोळा, शस्त्रे आणि आधीच कमकुवत झालेल्या शत्रूचा पूर्णपणे नाश करण्यासाठी आवश्यक असलेली सर्व साधने इराणमध्ये आणि त्याच्या आसपास तैनात राहतील, जोपर्यंत झालेल्या ‘खऱ्या कराराचे’ पूर्ण पालन होत नाही.”
ट्रम्प पुढे म्हणाले, “जर कोणत्याही कारणाने असे झाले नाही, ज्याची शक्यता अत्यंत कमी आहे, तर असा गोळीबार सुरू होईल, जो यापूर्वी कोणीही पाहिला नसेल; त्यापेक्षाही अधिक मोठा, अधिक प्रभावी आणि जबरदस्त असेल. खूप आधीच या बाबत सहमती झाली होती की कोणतेही अण्वस्त्र वापरले जाणार नाही आणि होर्मुज सामुद्रधुनी खुली व सुरक्षित ठेवली जाईल, याच्या उलट केलेली सर्व विधाने खोटी आहेत.”
धमकी देत ट्रम्प यांनी पुढे लिहिले, “दरम्यान, आमचे महान लष्कर पूर्ण तयारीत आहे आणि विश्रांती घेत आहे. खरं तर, ते आपल्या पुढील विजयाची आतुरतेने वाट पाहत आहे. अमेरिका पुन्हा परतली आहे!”
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode