
मुंबई, १ मे (हिं.स.) : सर्वसामान्य जनता आणि विशेषतः व्यावसायिकांना महागाईचा आणखी एक मोठा फटका बसला आहे. 19 किलोच्या व्यावसायिक एलपीजी (LPG) सिलिंडरच्या किंमतीत तब्बल 993 रुपयांची वाढ झाली आहे. या दरवाढीनंतर, दिल्लीमध्ये एका व्यावसायिक सिलिंडरची किंमत आता 3071.50 वर पोहोचली आहे. आता या निर्णयाचा थेट परिणाम हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि लहान व्यवसायांच्या दैनंदिन खर्चावर होणार आहे. दरम्यान घरगुती गॅस सिलिंडरच्या किंमतीत कोणताही बदल करण्यात आलेला नाही.
इराणमधील तणाव आणि 'स्ट्रेट ऑफ होर्मुझ' (Strait of Hormuz) जलमार्गाच्या संभाव्य नाकेबंदीमुळे निर्माण झालेल्या अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवर, आगामी काळात इंधनाच्या किंमतींमध्ये कधी आणि किती चढ-उतार होतील, याबद्दल लोकांच्या मनात धाकधूक निर्माण झाली होती. आता, 1 मे पासून नवीन महिन्याची सुरुवात होत असताना, एलपीजी गॅस सिलिंडर्सचे नवीन दर अधिकृतपणे जाहीर करण्यात आले आहेत.
व्यावसायिक सिलिंडरचे नवे दर
- दिल्लीत 993 रुपयांची वाढ होऊन आता किंमत 3,071.50 रुपये झाली आहे. पूर्वी ही किंमत 2,078.50 रुपये होती.
- मुंबईतही 993 रुपयांची वाढ होऊन आता किंमत 3,024 रुपये झाली आहे. पूर्वी ही किंमत 2,031 रुपये होती.
- कोलकाता येथे नवीन व्यावसायिक सिलिंडरे दर 3,202 रुपये झाली आहे.
- चेन्नईमध्ये व्यावसायिक सिलिंडरसाठी आता 3237 रुपये मोजावे लागतील.
---------------
हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी