
इस्लामाबाद, 01 मे (हिं.स.)।पाकिस्तानमध्ये जैश-ए-मोहम्मद आणि लश्कर-ए-तैयबा या दहशतवादी संघटनांच्या सदस्यांच्या संशयास्पद मृत्यूंची मालिका सुरूच आहे. त्याच पार्श्वभूमीवर बहावलपूर येथे अज्ञात वाहनाच्या धडकेत जैशचा वरिष्ठ कमांडर मौलाना सलमान याचा मृत्यू झाला.तो जैशचा प्रमुख मसूद अझहर याचा निकटवर्तीय होता आणि भारतातील अनेक मोठ्या दहशतवादी हल्ल्यांमध्ये सहभागी होता. यात 2001 भारतीय संसद हल्ला आणि 2019 पुलवामा हल्ला यांचा समावेश आहे.
तो अशा लोकांपैकी एक होता, जो ऑपरेशन सिंदूर दरम्यान बहावलपूरमधील जैशच्या मुख्यालयावर झालेल्या बॉम्बहल्ल्यात जखमी झाला होता. मौलाना सलमानला बुधवारी संध्याकाळी बहावलपूरमधील मरकज सुभानअल्लाह येथे पुरण्यात आले. त्याच्या अंत्यसंस्कारात आयएसआय चे काही अधिकारीही उपस्थित होते, ज्यामुळे या दहशतवादी संघटनांना पाकिस्तानच्या सरकारी यंत्रणेचा पाठिंबा असल्याचे सूचित होते. ऑपरेशन सिंदूर दरम्यान ठार झालेल्या अनेक दहशतवाद्यांच्या अंत्यसंस्कारातही पाकिस्तानी लष्कर आणि आयएसआयचे अधिकारी सहभागी झाले होते. या कारवाईत जैशचे अनेक मोठे कमांडर तसेच मसूद अझहरच्या कुटुंबातील सदस्य मारले गेले होते.
मौलाना सलमानपूर्वीही जैश आणि लश्करचे अनेक वरिष्ठ कमांडर किंवा दहशतवादी रहस्यमय परिस्थितीत ठार झाले आहेत. सलमानच्या मृत्यूच्या दोन दिवस आधी लश्करचा वरिष्ठ दहशतवादी शेख युसुफ अफरीदी याची खैबर पख्तूनख्वा येथे अज्ञात व्यक्तींनी हत्या केली होती. गेल्या वर्षी जैशचा प्रमुख रणनीतीकार मौलाना अब्दुल अझीज अझर याचाही संशयास्पद मृत्यू झाला होता, ज्याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
याच वर्षी 16 एप्रिल रोजी लश्करचा संस्थापक सदस्य मौलाना आमिर हमजा याच्यावर अज्ञात बंदूकधाऱ्यांनी गोळीबार केला, जेव्हा तो आपल्या गाडीत बसला होता. मात्र तो या हल्ल्यात बचावला असल्याची माहिती आहे.तसेच, गेल्या वर्षी मार्चमध्ये लश्करचा एक वरिष्ठ दहशतवादी अबू नताल यालाही झेलम जिल्ह्यात अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या घालून ठार केले होते. ऑपरेशन सिंदूर नंतर या दोन्ही संघटना पुन्हा मजबूत होण्याचा प्रयत्न करत होत्या, मात्र या रहस्यमय मृत्यूंमुळे त्यांना मोठा धक्का बसला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जैश आणि लश्कर या दोन्ही संघटनांमध्ये नेतृत्वाचे संकट गडद झाले आहे. मसूद अझहर यांची प्रकृती अत्यंत खराब असल्याची माहिती समोर येत आहे. आयएसआयच्या मार्गदर्शनाखाली जैश नव्या नेतृत्वाची उभारणी करण्याचा प्रयत्न करत आहे. पाकिस्तानी माध्यमांवर मसूद अझहर यांच्याशी संबंधित कोणतीही बातमी दाखवण्यावर ‘अघोषित बंदी’ असल्याचे सांगितले जाते. लश्करची स्थितीही याचप्रमाणे असून, त्याचा प्रमुख हाफिज सईद यांच्यावरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत आणि नव्या नेतृत्वाची मागणी जोर धरत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode