
नवी दिल्ली, 17 मे (हिं.स.)। वर्ष 2026 च्या दुसऱ्या महिन्यानंतर म्हणजेच फेब्रुवारीपासून देशांतर्गत शेअर बाजारात विदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांची (एफपीआय) विक्री मे महिन्यातही सातत्याने सुरू आहे. या महिन्यात विदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांनी शेअर बाजारात विक्री करून आतापर्यंत 27,048 कोटी रुपयांची माघार घेतली आहे. मे महिन्यात आतापर्यंत झालेल्या व्यवहारांतील विक्रीची आकडेवारी जोडल्यास, कॅलेंडर वर्ष 2026 मध्ये विदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांनी देशांतर्गत शेअर बाजारात केलेल्या निव्वळ विक्रीचा आकडा 2.20 लाख कोटी रुपयांच्या जवळ पोहोचला आहे.
नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल) यांच्या आकडेवारीनुसार, जानेवारीपासून ते या महिन्याच्या 15 मेपर्यंत एफपीआयने देशांतर्गत शेअर बाजारात एकूण 2,40,857 कोटी रुपयांची विक्री केली आहे. जानेवारी महिन्यात विदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांनी देशांतर्गत शेअर बाजारात 35,962 कोटी रुपयांची विक्री केली होती. फेब्रुवारी महिन्यात मात्र एफपीआयने विक्रीऐवजी खरेदीवर भर दिला. या महिन्यात त्यांनी भारतीय शेअर बाजारात 22,615 कोटी रुपयांची गुंतवणूक केली.
मार्च महिन्यात पुन्हा परिस्थिती बदलली. या महिन्यात एफपीआयने विक्रमी 1.17 लाख कोटी रुपयांची विक्रमी विक्री केली. एप्रिल महिन्यातही एफपीआयकडून सुरू असलेली विक्री कायम राहिली. या महिन्यात विदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांनी 60,847 कोटी रुपयांचे शेअर्स विकले. सध्याच्या महिन्यातही 15 मेपर्यंतच्या दहा व्यवहारिक दिवसांत एफपीआयने 27,048 कोटी रुपयांचे शेअर्स विकले आहेत. फेब्रुवारी महिन्यात विदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांनी केलेली 22,615 कोटी रुपयांची खरेदी जर या वर्षातील एकूण विक्रीच्या आकड्यातून वजा केली, तरीदेखील या वर्षात विदेशी गुंतवणूकदारांनी केलेल्या विक्रीचा आकडा 2 लाख कोटी रुपयांच्या वर म्हणजेच 2,18,242 कोटी रुपयांवर पोहोचलेला दिसत आहे.
मार्केट तज्ज्ञांच्या मते, यंदा विदेशी गुंतवणूकदारांकडून देशांतर्गत शेअर बाजारात होत असलेल्या विक्रीमागचे प्रमुख कारण म्हणजे जागतिक व्यापक आर्थिक अनिश्चितता होय. फिनरेक्स ट्रेझरी अॅडव्हायझर्स एलएलपीचे कार्यकारी संचालक अनिल भंसाली यांनी सांगितले की, भू-राजकीय तणावामुळे भारतासह उदयोन्मुख बाजारपेठांमध्ये गुंतवणूकदारांची जोखीम घेण्याची क्षमता प्रभावित झाली आहे. विदेशी गुंतवणूकदार विशेषतः भू-राजकीय धोका, महागाई, कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती आणि व्याजदरांबाबत चिंतित आहेत.
पश्चिम आशियातील तणावपूर्ण परिस्थितीमुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती सातत्याने प्रति बॅरल 100 डॉलरच्या वर कायम आहेत. त्यामुळे जगभरात महागाई वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. महागाईच्या भीतीमुळेही विदेशी गुंतवणूकदारांना आपला पैसा सुरक्षित ठेवण्यासाठी विक्रीचा मार्ग स्वीकारावा लागत असल्याचे मानले जात आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule