ॲपलची डब्ल्यूडब्ल्यूडीसी २०२६ परिषद ८ जूनपासून; कृत्रिम बुद्धिमत्तेवर असणार विशेष भर
मुंबई, 20 मे (हिं.स.)। ॲपलने आपल्या वार्षिक वर्ल्डवाइड डेव्हलपर्स कॉन्फरन्स अर्थात डब्ल्यूडब्ल्यूडीसी २०२६ च्या तारखांची अधिकृत घोषणा केली आहे. ही परिषद ८ जून ते १२ जून दरम्यान आयोजित करण्यात येणार असून जगभरातील डेव्हलपर्स, डिझायनर्स आणि विद्यार्थ्
Apple WWDC 2026 Conference Kicks Off June 8


मुंबई, 20 मे (हिं.स.)। ॲपलने आपल्या वार्षिक वर्ल्डवाइड डेव्हलपर्स कॉन्फरन्स अर्थात डब्ल्यूडब्ल्यूडीसी २०२६ च्या तारखांची अधिकृत घोषणा केली आहे. ही परिषद ८ जून ते १२ जून दरम्यान आयोजित करण्यात येणार असून जगभरातील डेव्हलपर्स, डिझायनर्स आणि विद्यार्थ्यांना एकत्र आणण्याचा कंपनीचा उद्देश आहे. ॲपलच्या विविध प्लॅटफॉर्मसाठी नव्या तंत्रज्ञानाचा, फ्रेमवर्कचा आणि साधनांचा वापर करून अधिक प्रगत अनुभव विकसित करण्यासाठी ही परिषद महत्त्वाची मानली जाते.

डब्ल्यूडब्ल्यूडीसी २०२६ ची सुरुवात ८ जून रोजी मुख्य उद्घाटनपर कार्यक्रमाने होणार आहे. त्यानंतर ‘प्लॅटफॉर्म्स स्टेट ऑफ द युनियन’ हे विशेष सत्र होईल. या सत्रात कृत्रिम बुद्धिमत्ता, नव्या सॉफ्टवेअर प्रणाली आणि डेव्हलपर साधनांबाबत महत्त्वपूर्ण घोषणा केल्या जाण्याची शक्यता आहे. ॲपलने दिलेल्या माहितीनुसार, परिषदेदरम्यान शंभरहून अधिक नव्या व्हिडीओ सत्रांचे आयोजन करण्यात येणार आहे. यात तंत्रज्ञान, डिझाइन आणि विकास प्रक्रियेबाबत सविस्तर मार्गदर्शन केले जाणार आहे. तसेच सहभागीांना समूह प्रयोगशाळांमध्ये सहभागी होता येणार असून ॲपल डेव्हलपर फोरमवर थेट संवादाची संधीही मिळणार आहे.

कंपनीने ८ जून रोजी ॲपल पार्क येथे होणाऱ्या विशेष कार्यक्रमासाठी एक हजाराहून अधिक डेव्हलपर्स, डिझायनर्स आणि विद्यार्थ्यांना निमंत्रित केले आहे. भारतात हा मुख्य कार्यक्रम भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री १०.३० वाजता सुरू होईल, तर ‘प्लॅटफॉर्म्स स्टेट ऑफ द युनियन’ हे सत्र रात्री १.३० वाजता पाहता येणार आहे. हा कार्यक्रम ॲपलच्या अधिकृत संकेतस्थळावर, ॲपल टीव्ही अनुप्रयोगावर आणि यूट्यूब वाहिनीवर थेट प्रसारित केला जाणार आहे. याशिवाय व्हिडीओ सत्रे आणि मार्गदर्शक माहिती ॲपल डेव्हलपर संकेतस्थळ, अनुप्रयोग, यूट्यूब आणि बिलिबिलीवर उपलब्ध असेल.

यंदाच्या परिषदेत नव्या ‘सिरी’वर सर्वाधिक लक्ष असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित अधिक सक्षम ‘सिरी’ सादर करण्याची तयारी ॲपलकडून सुरू असून त्यासाठी गूगल च्या ‘जेमिनी’ कृत्रिम बुद्धिमत्ता मॉडेलची मदत घेतली जाऊ शकते. याशिवाय ‘ॲपल इंटेलिजन्स’ अंतर्गत नवे कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित आरोग्य सहाय्यक, अधिक संवादक्षम शोध प्रणाली आणि वापरकर्त्यांच्या माहितीचे विश्लेषण करून आरोग्यविषयक मार्गदर्शन देणारी वैशिष्ट्ये सादर होण्याची शक्यता आहे.

तसेच कंपनी पुढील पिढीची ‘आयओएस २७’ प्रणाली सादर करू शकते. यासोबतच ‘मॅकओएस’, ‘आयपॅडओएस’, ‘वॉचओएस’, ‘टीव्हीओएस’ आणि ‘व्हिजनओएस’ या प्रणालींच्याही नव्या आवृत्त्या सादर होण्याची अपेक्षा आहे. ‘लिक्विड ग्लास’ इंटरफेसमध्येही अधिक सुधारणा करण्यात येणार असल्याचे मानले जात आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande