
मुंबई, 20 मे (हिं.स.)। स्मार्टफोन उत्पादक कंपनी मोटोरोलाने आपल्या ‘जी’ मालिकेचा विस्तार करत भारतीय बाजारात ‘मोटो जी३७’ आणि ‘मोटो जी३७ पॉवर’ हे दोन नवे बजेट स्मार्टफोन लॉन्च केले आहेत. आकर्षक डिझाइन, मोठी बॅटरी, प्रगत कॅमेरा आणि वेगवान डिस्प्ले अशा वैशिष्ट्यांसह हे स्मार्टफोन ग्राहकांसाठी उपलब्ध करण्यात आले आहेत. याचबरोबर कंपनीने ‘मोटो बड्स २’ हे नवे ट्रू वायरलेस स्टीरिओ इअरबड्सही बाजारात आणले आहेत.
‘मोटो जी३७’ आणि ‘मोटो जी३७ पॉवर’ या दोन्ही स्मार्टफोनमध्ये ६.६ इंचांचा एचडी प्लस एलसीडी डिस्प्ले देण्यात आला आहे. या स्क्रीनला १२० हर्ट्झ रिफ्रेश रेट, १२० हर्ट्झ टच सॅम्पलिंग रेट, १,०५० निट्सपर्यंत पीक ब्राइटनेस आणि कॉर्निंग गोरिल्ला ग्लास ७आयचे संरक्षण देण्यात आले आहे. हे दोन्ही स्मार्टफोन अँड्रॉइड १६ प्रणालीवर कार्य करतात. तसेच ड्युअल सिम सुविधा आणि मीडियाटेक डायमेन्सिटी ६४०० प्रोसेसर देण्यात आला आहे.
या दोन्ही स्मार्टफोनमधील सर्वात मोठा फरक बॅटरी क्षमतेमध्ये आहे. ‘मोटो जी३७’मध्ये ५,२०० एमएएच क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे, तर ‘मोटो जी३७ पॉवर’मध्ये तब्बल ७,००० एमएएचची मोठी बॅटरी देण्यात आली आहे. त्यामुळे दीर्घकाळ फोन वापरणाऱ्या ग्राहकांसाठी ‘जी३७ पॉवर’ अधिक उपयुक्त ठरणार आहे.
कॅमेऱ्याबाबत बोलायचे झाल्यास, या स्मार्टफोनमध्ये ५० मेगापिक्सेलचा रिअर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. तसेच ८ जीबीपर्यंत रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज पर्याय उपलब्ध आहेत.
किंमतीबाबत सांगायचे झाल्यास, ‘मोटो जी३७’ हा ४ जीबी रॅम आणि ६४ जीबी स्टोरेज प्रकारात उपलब्ध असून त्याची किंमत १३ हजार ९९९ रुपये ठेवण्यात आली आहे. हा फोन पॅनटोन इम्पेनेट्रेबल आणि पॅनटोन कॅप्री या रंगांमध्ये मिळणार आहे. दुसरीकडे ‘मोटो जी३७ पॉवर’चा ४ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज प्रकार १५ हजार ९९९ रुपयांना उपलब्ध असेल, तर ८ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज प्रकाराची किंमत १८ हजार ९९९ रुपये ठेवण्यात आली आहे. हा फोन पॅनटोन नॉटिकल ब्लू, पॅनटोन इम्पेनेट्रेबल आणि पॅनटोन कॅप्री रंगांमध्ये सादर करण्यात आला आहे.
कंपनीने ‘मोटो बड्स २’ हे इअरबड्सही २ हजार ९९९ रुपयांत लॉन्च केले आहेत. यामध्ये ड्युअल ११ मिमी डायनॅमिक ड्रायव्हर, ५५ डेसिबल डायनॅमिक अॅक्टिव्ह नॉइज कॅन्सलेशन, आयपी५४ धूळ व पाणी प्रतिरोधक क्षमता आणि ब्लूटूथ ६.० कनेक्टिव्हिटी देण्यात आली आहे.
या सर्व उपकरणांची पहिली विक्री २५ मे २०२६ रोजी कंपनीच्या अधिकृत संकेतस्थळावर, फ्लिपकार्ट आणि प्रमुख रिटेल स्टोअर्समध्ये होणार आहे. लॉन्च ऑफरअंतर्गत आयडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक आणि एसबीआय बँकेच्या क्रेडिट कार्डधारकांना ५ हजार रुपयांपर्यंत तात्काळ सवलत मिळणार आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule