
नवी दिल्ली, 20 मे (हिं.स.)। पश्चिम आशियातील वाढता भू-राजकीय तणाव आणि आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत झालेली वाढ याचा थेट परिणाम आज भारतीय शेअर बाजारावर दिसून आला. बुधवारी (दि.२०) बाजार उघडताच मोठ्या प्रमाणात विक्रीचा दबाव निर्माण झाला आणि प्रमुख निर्देशांक घसरणीसह व्यवहार करताना दिसले. सलग दुसऱ्या दिवशी बाजारात घसरण कायम राहिल्याने गुंतवणूकदारांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
मुंबई शेअर बाजाराचा प्रमुख निर्देशांक ‘बीएसई सेन्सेक्स’ आज ३९४.३६ अंकांनी म्हणजेच ०.५२ टक्क्यांनी घसरून ७४,८०६.४९ अंकांवर उघडला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा ‘एनएसई निफ्टी ५०’ निर्देशांक १६०.७५ अंकांनी म्हणजेच ०.६८ टक्क्यांनी कोसळून २३,४५७.२५ अंकांवर व्यवहार सुरू झाला. विशेष म्हणजे, मंगळवारी बाजाराची सुरुवात सकारात्मक झाली होती, मात्र शेवटी तो घसरणीसह बंद झाला होता. त्यानंतर आज पुन्हा बाजारात मोठी पडझड पाहायला मिळाली.
आजच्या व्यवहारात सेन्सेक्समधील ३० पैकी तब्बल २९ कंपन्यांचे शेअर्स घसरणीसह लाल निशाणावर उघडले. केवळ एका कंपनीचा शेअर वाढीसह हिरव्या निशाणावर दिसला. निफ्टी ५० मधील परिस्थितीही जवळपास अशीच होती. निफ्टीतील ५० पैकी ४९ कंपन्यांचे शेअर्स घसरले, तर फक्त एका शेअरमध्ये वाढ नोंदवली गेली. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील आघाडीची कंपनी ‘टीसीएस’चा शेअर ०.१४ टक्क्यांच्या वाढीसह व्यवहार करत होता. दुसरीकडे, ‘बीईएल’चा शेअर सर्वाधिक २.०४ टक्क्यांनी घसरला.
बाजारातील प्रमुख घसरणीमध्ये टाटा स्टीलचा शेअर १.९४ टक्क्यांनी घसरला. एटरनलमध्ये १.७८ टक्के, मारुती सुझुकीमध्ये १.५५ टक्के, महिंद्रा अँड महिंद्रामध्ये १.४९ टक्के आणि बजाज फायनान्समध्ये १.३४ टक्क्यांची घसरण झाली. तसेच स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये १.२१ टक्के, आयसीआयसीआय बँकेत १.१८ टक्के आणि टेक महिंद्रामध्ये १.०८ टक्के घसरण नोंदवली गेली.
याशिवाय बजाज फिनसर्व्ह, एनटीपीसी, हिंदुस्थान युनिलिव्हर, पॉवर ग्रिड, अल्ट्राटेक सिमेंट, ट्रेंट, कोटक महिंद्रा बँक, एशियन पेंट्स, एचसीएल टेक, इंडिगो, आयटीसी, टायटन, अॅक्सिस बँक, एलअँडटी, अदानी पोर्ट्स, एचडीएफसी बँक, रिलायन्स इंडस्ट्रीज, इन्फोसिस, सन फार्मा आणि भारती एअरटेल यांच्या शेअर्समध्येही घसरण दिसून आली. जागतिक स्तरावरील अनिश्चितता आणि वाढत्या कच्च्या तेलाच्या किमतीमुळे आगामी काही दिवस बाजारात अस्थिरता कायम राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, आंतरराष्ट्रीय बाजारात ब्रेंट कच्च्या तेलाच्या किंमती ०.७७ टक्क्यांनी घसरून प्रति बॅरल ११०.४२ डॉलरवर आल्या, तर अमेरिकन डब्ल्यूटीआय कच्चे तेल १ टक्क्यांनी घसरून १०३.१२ डॉलर प्रति बॅरलवर व्यवहार करत होते. आशियाई बाजारांमध्ये सलग चौथ्या दिवशी घसरण दिसून आली असून निक्केई, हँगसेंग आणि कोस्पी निर्देशांकात २ टक्क्यांपर्यंत कमजोरी नोंदवली गेली. याआधी अमेरिकेतील वॉल स्ट्रीट बाजारातही एसअँडपी ५०० आणि नॅस्डॅक निर्देशांक घसरणीसह बंद झाले होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule