
कोलकाता, 21 मे (हिं.स.)।कोलकाता उच्च न्यायालय यांनी तृणमूल काँग्रेसचे खासदार अभिषेक बॅनर्जी यांना मोठा दिलासा दिला आहे. न्यायालयाने पश्चिम बंगाल पोलिसांना त्यांच्या विरोधात कोणतीही दंडात्मक कारवाई करण्यापासून रोखले आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याविरोधात निवडणूक प्रचारसभांदरम्यान करण्यात आलेल्या कथित आक्षेपार्ह वक्तव्याशी संबंधित प्रकरणात कोलकाता उच्च न्यायालयाने हा निर्णय दिला आहे. न्यायालयाने म्हटले आहे की, पोलिसांनी 31 जुलैपर्यंत अभिषेक बॅनर्जी यांच्याविरोधात कोणतीही दंडात्मक कारवाई करू नये.
न्यायमूर्ती सौगत भट्टाचार्य यांनी अंतरिम आदेश देताना म्हटले, “अहवालांचा विचार करता आणि कथित गुन्ह्याचे स्वरूप लक्षात घेता, न्यायालयाचे मत आहे की याचिकाकर्त्याची कोठडीतील चौकशी आवश्यक नाही. तसेच, याचिकाकर्त्याचा अधिकार बीएनएसएसच्या कलम 35(3) अंतर्गत संरक्षित आहे. या टप्प्यावर न्यायालय पोलिसांना निर्देश देते की, 31 जुलैपर्यंत किंवा पुढील आदेश येईपर्यंत, जे आधी होईल, याचिकाकर्त्याविरोधात कोणतीही दंडात्मक कारवाई करू नये.”
निवडणूक प्रचारादरम्यान एका सभेत अभिषेक बॅनर्जी यांनी अमित शाह यांना आव्हान देत म्हटले होते, “मी अमित शाह यांना आव्हान देतो, तुमच्यात दम असेल तर 4 तारखेला कोलकात्यात थांबा. दुपारी 12 नंतर भेट होईल. तुम्ही किती मोठे गुंड आहात, हे 4 तारखेला समजेल. खेळा तुम्ही सुरू केला आहे, उरलेले टीएमसी करेल.”4 जून रोजी निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर अभिषेक बॅनर्जी यांच्या या वक्तव्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झाला. त्यानंतर बिधाननगर सायबर क्राइम पोलीस ठाण्याने समाजसेवक राजीव सरकार यांच्या तक्रारीवरून अभिषेक बॅनर्जी यांच्याविरोधात एफआयआर दाखल केला होता.
तक्रारदाराने आरोप केला की, निवडणूक प्रचारादरम्यान अभिषेक बॅनर्जी यांनी अनेक ठिकाणी भडकाऊ भाषणे केली आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना उघडपणे धमकी दिली, ज्यामुळे सार्वजनिक शांतता आणि सांप्रदायिक सौहार्द बिघडण्याचा धोका निर्माण झाला.एफआयआर दाखल झाल्यानंतर अभिषेक बॅनर्जी यांनी याविरोधात उच्च न्यायालयात धाव घेतली आणि आक्षेपार्ह वक्तव्यांप्रकरणी दाखल करण्यात आलेली एफआयआर रद्द करण्याची मागणी केली. या याचिकेवरील सुनावणी दरम्यान उच्च न्यायालयाने अभिषेक बॅनर्जी यांच्याविरोधातील कारवाईवर स्थगिती दिली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode