



मुंबई, 21 मे (हिं.स.) - येथील वांद्रे (पूर्व) रेल्वे स्थानकालगत असलेल्या गरीबनगर भागात सुरू असलेल्या अतिक्रमणविरोधी कारवाईदरम्यान दुसऱ्या दिवशी (बुधवारी) हिंसक वळण लागले होते. अनधिकृत झोपड्यांवर पश्चिम रेल्वे आणि पालिकेकडून सुरू असलेल्या बुलडोझर कारवाईच्या दुसऱ्या दिवशी काही समाजकंटकांनी पोलिसांवर जोरदार दगडफेक केली. याप्रकरणी कडक पावले उचलत निर्मलनगर पोलिसांनी दगडफेक करणाऱ्या 15 जणांना अटक केली आहे. या हिंसक घटनेत 3 पोलीस कर्मचारी गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर जवळच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, आज या कारवाईचा तिसरा दिवस असून अद्याप 40 टक्के अनधिकृत इमारती पाडण्याचे काम शिल्लक आहे. परिसरात सध्या चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात आहे.
वांद्रे रेल्वे स्थानकाच्या पूर्व दिशेला असलेल्या अनधिकृत झोपड्या हटवण्याचे काम शेकडो पोलिसांच्या कडक बंदोबस्तात सुरू आहे. मुंबई पोलिसांनी दगडफेक केल्याप्रकरणी दाखल केलेल्या पहिल्या एफआयआरमध्ये एकूण 10 आरोपींची नावे नमूद केली आहेत. यामध्ये भारतीय न्याय संहिता अंतर्गत कलम 61(2), 109, 121(1), 121(2), 132, 189(2), 189(3), 191(2), 191(3), 190 तसेच रेल्वे पोलीस कायदा कलम 146 आणि सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान प्रतिबंधक कायदा कलम 3 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. तर दगडफेकी प्रकरणी 100 ते 150 जणांवर हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या गंभीर प्रकरणाची दखल घेत वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी संपूर्ण घटनेची सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे इतर दगडफेक करणाऱ्यांची ओळख पटवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून, त्यांच्यावरही लवकरच कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. ही अतिक्रमणविरोधी मोहीम पुढील दोन दिवस अशीच सुरू राहणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
सध्या वांद्रे टर्मिनस स्थानकावरून 22 मेल-एक्सप्रेस सुटतात. येत्या काही वर्षांत ही संख्या 50 टक्क्यांनी वाढणार आहे. पश्चिम रेल्वेच्या मुंबई विभागातून 50 नव्या मेल-एक्सप्रेस गाड्या सुरू करण्याचं उद्दिष्ट आहे. अनेक वर्षांच्या कायदेशीर प्रक्रियेनंतर गरीबनगर येथील अतिक्रमण हटवण्यात यश मिळाले असल्याची माहिती पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी विनीत अभिषेक यांनी दिली आहे.
वांद्रे अतिक्रमण प्रकरण नेमकं काय?
वांद्रे स्टेशन परिसरात, पश्चिम रेल्वेच्या जागेवर अनधिकृत बांधकामं आणि झोपडपट्ट्यांचं अतिक्रमण करण्यात आलं आहे. रेल्वे स्टेशनला लागूनच या अनधिकृत झोपडपट्ट्या असल्याने प्रवाशांच्या सुरक्षेची समस्याही निर्माण झाली होती. या ठिकाणी 500 हून अधिक झोपडपट्ट्या होत्या. त्यामुळे तब्बल 5 हजार स्क्वेअर मीटरवरचं अतिक्रमण होतं. येथे जमा होणाऱ्या कचऱ्यामुळे अनेकदा आगीच्याही घटना घडल्या आहेत. 27 नोव्हेंबर 2017 रोजी पहिल्यांदा या जागेवरचं अतिक्रमण हटवण्याचे आदेश काढण्यात आले. त्या विरोधात स्थानिकांनी न्यायालयात धाव घेतली. सुमारे नऊ वर्षे या प्रकरणावर मुंबई उच्च न्यायालयात आणि सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. अखेर 29 एप्रिल 2026 रोजी मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार अनधिकृत अतिक्रमण हटवण्यास मंजुरी देण्यात आली. उच्च न्यायालयाच्या परवानगीनंतर पश्चिम रेल्वेकडून अतिक्रमण हटवण्याची मोठी कारवाई सुरू झाली. या ठिकाणचे अतिक्रमण हटवून त्या ठिकाणी अतिरिक्त लांब पल्ल्याच्या रेल्वे सेवांसाठी मार्ग करण्यात येणार असल्याची माहिती आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी