
नवी दिल्ली, 21 मे (हिं.स.) - आफ्रिकन देशांमध्ये पसरत असलेल्या ‘इबोला’ विषाणूच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने देशातील सर्व आंतरराष्ट्रीय विमानतळे, बंदरे आणि सीमा सुरक्षा चौक्यांवर विशेष मार्गदर्शक सूचना (ॲडव्हायझरी) लागू केल्या आहेत. ‘उच्च जोखीम’ असलेल्या देशांमधून येणाऱ्या प्रवाशांवर विशेष लक्ष ठेवले जात आहे.
इबोला विषाणूने काही आफ्रिकन देशात थैमान घातले आहे. या पार्श्वभूमीवर, जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) डेमोक्रेटिक रिपब्लिक ऑफ काँगो आणि युगांडामध्ये पसरलेल्या इबोलाला 'पब्लिक हेल्थ इमर्जन्सी ऑफ इंटरनॅशनल कन्सर्न' अर्थात आंतरराष्ट्रीय चिंतेची सार्वजनिक आरोग्य आणीबाणी घोषित केली आहे. यानंतर आता भारतात केंद्रीय आरोग्य तथा कुटुंब कल्याण मंत्रालयानेही या व्हायरसच्या पार्श्वभूमीवर सतर्कता वाढवली आहे. केंद्र सरकार या संपूर्ण परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे.
इबोलाच्या पार्श्वभूमीवर, महासंचालक आरोग्य सेवा यांनी सर्व आंतरराष्ट्रीय विमानतळांना ॲडव्हायझरी पाठवली आहे. विशेषतः डीआर काँगो, युगांडा आणि दक्षिण सुदान यांसारख्या हाय रिस्क असलेल्या देशांमधून येणाऱ्या प्रवाशांसाठी ही सतर्कता आहे. महत्वाचे म्हणजे, ॲडव्हायझरीमध्ये, जर एखाद्या प्रवाशामध्ये ताप, डोकेदुखी, अशक्तपणा, उलट्या-जुलाब, घशात खवखव किंवा रक्तस्त्राव यांसारखी लक्षणे आढळली, तर त्याने इमिग्रेशनपूर्वीच विमानतळ आरोग्य अधिकाऱ्याला या यासंदर्भात माहिती देणे आवश्यक असेल, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
भारतात आल्यानंतर २१ दिवसांच्या आत लक्षणे आढळल्यास, तत्काळ डॉक्टरांशी संपर्क साधून आपली ट्रॅव्हल हिस्ट्री सांगण्याचे निर्देशही ॲव्हायजरीमध्ये देण्यात आले आहेत. महत्वाचे म्हणजे, 'एअरपोर्ट हेल्थ ऑर्गनायझेशन' या संपूर्ण प्रक्रियेवर लक्ष ठेवून आहे. प्रवाशांना स्क्रिनिंगमध्ये सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
आरोग्य मंत्रालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आणि राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्र तथा एकात्मिक रोग देखरेख कार्यक्रमाने परिस्थितीचा आढावा घेतला आहे. तसेच, सार्वजनिक आरोग्य उपाय मजबूत करण्याचे निर्देशही दिले आहेत. आरोग्य मंत्रालयाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने म्हटले आहे की, सध्या भारतात इबोलाचा एकही रुग्ण आढळलेला नाही. देशासाठी याचा धोका फार कमी आहे. मात्र, खबरदारी म्हणून ही तयारी केली जात आहे. याशिवाय, संसर्गित रुग्णाच्या रक्ताच्या अथवा बॉडी फ्लुइडच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींवरही लक्ष ठेवले जात आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी