विकास लवांडे यांना अखेर अटक; अंतरिम अटकपूर्व जामीन रद्द
पुणे, 21 मे (हिं.स.)। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते विकास लवांडे यांना अखेर पोलिसांनी अटक केली आहे. वारकरी संप्रदायाबाबत केलेल्या कथित वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी दाखल गुन्ह्यात पुणे न्यायालयाने त्यांचा अंतरिम अटकपूर्व जामीन रद
gf


पुणे, 21 मे (हिं.स.)।

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते विकास लवांडे यांना अखेर पोलिसांनी अटक केली आहे. वारकरी संप्रदायाबाबत केलेल्या कथित वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी दाखल गुन्ह्यात पुणे न्यायालयाने त्यांचा अंतरिम अटकपूर्व जामीन रद्द केल्यानंतर ही कारवाई करण्यात आली.

विकास लवांडे यांनी वारकरी संप्रदायात घुसखोरी होत असल्याचा दावा केल्याचा आरोप करण्यात आला होता. या वक्तव्याविरोधात नलिनी आशिष वायाळ (रा. येरवडा) यांनी वाघोली पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर लवांडे यांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला होता.

या प्रकरणात अतिरिक्त सत्र न्यायालयाने यापूर्वी २० मेपर्यंत अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर केला होता. तसेच तपास अधिकारी आणि सरकारी पक्षाला आपली भूमिका मांडण्याचे निर्देशही न्यायालयाने दिले होते.

दरम्यान, तपासादरम्यान विकास लवांडे यांनी अटकपूर्व जामीन अर्जामध्ये स्वतःविरोधातील पूर्वीचे चार गुन्हे लपविल्याचे समोर आले. यावर सरकारी वकील राजेश कावेडिया यांनी न्यायालयात आक्षेप घेत संरक्षण रद्द करण्याची मागणी केली.

सरकारी पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य धरत न्यायालयाने लवांडे यांचा अंतरिम अटकपूर्व जामीन रद्द केला. त्यानंतर वाघोली पोलिसांनी तत्काळ कारवाई करत त्यांना ताब्यात घेतले. या घटनेमुळे राजकीय तसेच वारकरी वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande