एनआयएकडून पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याप्रकरणी कोलकाता येथील रहिवाशाला अटक
कोलकाता, २१ मे (हिं.स.)राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) कोलकाता येथील रहिवासी झफर रियाझ उर्फ रिझवी याला पाकिस्तानी गुप्तचर संस्थांसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली अटक केली आहे. एनआयएने त्याला बुधवारी अटक केली आणि गुरुवारी एक अधिकृत निवेदन जारी केले
एनआयएचा लोगो


कोलकाता, २१ मे (हिं.स.)राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) कोलकाता येथील रहिवासी झफर रियाझ उर्फ रिझवी याला पाकिस्तानी गुप्तचर संस्थांसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली अटक केली आहे. एनआयएने त्याला बुधवारी अटक केली आणि गुरुवारी एक अधिकृत निवेदन जारी केले. संस्थेनुसार, आरोपी भारताच्या सुरक्षा व्यवस्थेशी संबंधित गोपनीय माहिती पाकिस्तानी गुप्तचर अधिकाऱ्यांना देत होता. भारतविरोधी दहशतवादी कटाशी संबंधित एका प्रकरणात ही कारवाई करण्यात आली आहे.

एनआयएच्या म्हणण्यानुसार, झफर रियाझविरुद्ध लुकआऊट सर्क्युलर आधीच जारी करण्यात आले होते आणि त्याला फरार घोषित करण्याची प्रक्रिया सुरू होती. आरोपीला भारतीय दंड संहिता, शासकीय गुप्तता कायदा आणि बेकायदेशीर कृत्ये (प्रतिबंध) कायद्याच्या विविध कलमांखाली अटक करण्यात आली आहे.

तपास यंत्रणेने म्हटले आहे की, झफर रियाझ २००५ पासून भारत आणि पाकिस्तान दरम्यान नियमितपणे प्रवास करत होता. या काळात, पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणांनी त्याच्याशी संपर्क साधला आणि त्याला पैसे व पाकिस्तानी नागरिकत्वाचे आमिष दाखवून हेरगिरीच्या कारवायांमध्ये ओढले. त्याने एका पाकिस्तानी महिलेशी लग्न केले असून, त्याची मुलेही पाकिस्तानी नागरिक आहेत, अशी माहिती आहे.

एनआयएच्या म्हणण्यानुसार, आरोपीने हेरगिरी आणि दहशतवादी कारवायांमध्ये सामील असलेल्या इतरांना मदत करण्यासाठी पाकिस्तानी गुप्तचर अधिकाऱ्यांना भारतीय मोबाईल क्रमांकांचे वन-टाइम पासवर्ड (OTPs) पुरवले. या क्रमांकांचा वापर करून व्हॉट्सॲप खाती सक्रिय करण्यात आली, ज्यांचा उपयोग भारतात सक्रिय असलेल्या इतर आरोपींशी गुप्त संपर्क ठेवण्यासाठी केला गेला.

या यंत्रणेने दावा केला आहे की, झफर रियाझला यापूर्वी भारतीय दंड संहिता आणि शासकीय गुप्तता कायद्यांतर्गत हेरगिरीशी संबंधित प्रकरणांमध्ये दोषी ठरवण्यात आले आहे. एनआयए सध्या संपूर्ण हेरगिरी नेटवर्कचा सखोल तपास करत असून, या कटात सामील असलेल्या इतर व्यक्तींना ओळखण्याचा प्रयत्न करत आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे


 rajesh pande