
चंद्रपूर, 22 मे (हिं.स.) : चंद्रपूर जिल्ह्याच्या सिंदेवाही तालुक्यातील गुंजेवाही परिसरात आज, शुक्रवारी तेंदूपत्ता संकलनासाठी जंगलात गेलेल्या महिलांवर वाघाने हल्ला केल्याची घटना घडली. या भीषण हल्ल्यात 4 महिलांचा घटनास्थळीच मृत्यू झाल्याने संपूर्ण परिसरात भीती आणि तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
यासंदर्भातील अधिकृत माहितीनुसार, उन्हाळ्याच्या हंगामात तेंदूपत्ता तोडणीला सुरुवात झाल्यामुळे ग्रामीण भागातील नागरिक मोठ्या प्रमाणात जंगलात जात आहेत. आज पहाटेच्या सुमारास गुंजेवाही गावातील काही महिला नेहमीप्रमाणे जंगलात तेंदूपत्ता संकलनासाठी गेल्या होत्या. सकाळी सुमारे 8 वाजण्याच्या दरम्यान जंगलात दबा धरून बसलेल्या वाघाने अचानक त्यांच्यावर हल्ला चढवला.प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, वाघाने कोणतीही संधी न देता सलग हल्ले केले. या हल्ल्यात चारही महिलांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
वाघाच्या हल्ल्याची माहिती मिळताच सिंदेवाही वनपरिक्षेत्र अधिकारी अंजली सायंकर यांनी तातडीने घटनास्थळी भेट दिली. वन विभाग आणि पोलिस पथकाने परिसराची पाहणी करून पंचनामा सुरू केला आहे. मृत महिलांमध्ये कवडूबाई दादाजी मोहुर्ले (45), अनुबाई दादाजी मोहुर्ले (46), संगीता संतोष चौधरी (36) आणि सुनीता कौशिक मोहुर्ले (33) यांचा समावेश आहे. दरम्यान, या घटनेनंतर ग्रामस्थांमध्ये तीव्र रोष व्यक्त केला जात आहे. वाघाचा तातडीने बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. वन विभागाने नागरिकांना जंगल परिसरात सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले असून संबंधित भागात गस्त वाढविण्यात आली आहे.या घटनेमुळे संपूर्ण सिंदेवाही तालुका हादरला असून तेंदूपत्ता हंगामात जंगलातील नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा गंभीर बनला आहे.
------------------------------
हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी