सायप्रस राष्ट्राध्यक्षांची पंतप्रधान मोदींसोबत महत्त्वपूर्ण बैठक
नवी दिल्ली, 22 मे (हिं.स.)।भारत आणि सायप्रसमधील संबंधांना नवी बळकटी देण्याच्या दिशेने शुक्रवारी नवी दिल्लीतील हैदराबाद हाऊसमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सायप्रसचे राष्ट्राध्यक्ष निकोस ख्रिस्तोडुलिडीस यांच्यात द्विपक्षीय चर्चा झाली. पंतप्रधान मोद
सायप्रस राष्ट्राध्यक्षांची पंतप्रधान मोदींसोबत महत्त्वपूर्ण बैठक


नवी दिल्ली, 22 मे (हिं.स.)।भारत आणि सायप्रसमधील संबंधांना नवी बळकटी देण्याच्या दिशेने शुक्रवारी नवी दिल्लीतील हैदराबाद हाऊसमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सायप्रसचे राष्ट्राध्यक्ष निकोस ख्रिस्तोडुलिडीस यांच्यात द्विपक्षीय चर्चा झाली. पंतप्रधान मोदी यांनी सांगितले की, दोन्ही देशांतील मैत्री केवळ मजबूतच नाही, तर भविष्यातील गरजा आणि संधींनुसारही विकसित होत आहे. या बैठकीला परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल आणि परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांच्यासह दोन्ही देशांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

पंतप्रधान मोदी आणि राष्ट्राध्यक्ष निकोस ख्रिस्तोडुलिडीस यांनी संयुक्त पत्रकार परिषदेला संबोधित केले. यावेळी पंतप्रधान मोदी म्हणाले की, दोन्ही देशांतील संबंधांनी वेळोवेळी विश्वासाची कसोटी पार केली आहे आणि आता या संबंधांना नवी दिशा देण्यासाठी त्यांना रणनीतिक भागीदारीच्या स्तरावर नेले जात आहे.

पंतप्रधान मोदी यांनी राष्ट्राध्यक्ष निकोस ख्रिस्तोडुलिडीस आणि त्यांच्या प्रतिनिधीमंडळाचे भारतात स्वागत करताना सांगितले की, गेल्या वर्षी सायप्रस दौऱ्यादरम्यान त्यांना मिळालेल्या आत्मीय स्वागत आणि सन्मानाला भारत कधीही विसरणार नाही. त्यांनी म्हटले की, सायप्रसने दिलेला सर्वोच्च नागरी सन्मान हा भारतावरील आदर आणि दोन्ही देशांतील दृढ संबंधांचे प्रतीक आहे. पंतप्रधान मोदी म्हणाले की, भारत आणि सायप्रस यांची भागीदारी लोकशाही, कायद्याचे राज्य, तसेच सार्वभौमत्व आणि प्रादेशिक अखंडतेच्या आदरासारख्या समान मूल्यांवर आधारित आहे. त्यांनी स्पष्ट केले की, भारत या तत्त्वांप्रती कायम कटिबद्ध राहील.

पंतप्रधानांनी सांगितले की, गेल्या दशकात सायप्रसकडून भारतात झालेली गुंतवणूक जवळपास दुप्पट झाली आहे, जे दोन्ही देशांतील वाढत्या विश्वासाचे प्रतीक आहे. त्यांनी म्हटले की, भारत-युरोपियन संघ मुक्त व्यापार करारामुळे (FTA) अनेक नव्या आर्थिक संधी निर्माण झाल्या आहेत आणि पुढील पाच वर्षांत ही गुंतवणूक पुन्हा दुप्पट करण्याचे भारताचे लक्ष्य आहे.

पंतप्रधान मोदी यांनी सांगितले की, दोन्ही नेत्यांमध्ये जागतिक मुद्द्यांवरही चर्चा झाली. ते म्हणाले की, युक्रेनचा प्रश्न असो किंवा पश्चिम आशियातील परिस्थिती, भारत शांतता आणि संघर्षांच्या त्वरित समाधानासाठीच्या प्रयत्नांना पाठिंबा देत राहील. तसेच, जागतिक आव्हानांचा सामना करण्यासाठी आंतरराष्ट्रीय संस्थांमध्ये सुधारणा आवश्यक असल्याचेही त्यांनी नमूद केले.

पंतप्रधान मोदी म्हणाले की, भारत-सायप्रस रणनीतिक भागीदारीमुळे दोन्ही देशांतील संबंधांना नवी ऊर्जा, नवी महत्त्वाकांक्षा आणि नवी गती मिळेल. सायप्रसचे राष्ट्राध्यक्ष निकोस ख्रिस्तोडुलिडीस यांनी सांगितले की, त्यांच्या दौऱ्याचा मुख्य उद्देश भारत आणि सायप्रस यांच्यातील द्विपक्षीय संबंध अधिक मजबूत करणे, तसेच भारत आणि युरोपियन संघ यांच्यातील व्यापक रणनीतिक भागीदारीला पुढे नेणे हा आहे.राष्ट्राध्यक्ष ख्रिस्तोडुलिडीस म्हणाले की, “मी आज येथे केवळ सायप्रस प्रजासत्ताकाचा राष्ट्राध्यक्ष म्हणून उपस्थित नाही, तर युरोपियन संघाच्या त्या सदस्य देशाचा प्रतिनिधी म्हणूनही उपस्थित आहे, जो सध्या युरोपियन संघ परिषदचे अध्यक्षपद भूषवत आहे.”

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande