
कोलकाता, 22 मे (हिं.स.)।प्रवर्तन संचालनालयाने (ईडी) शुक्रवारी पश्चिम बंगालमधील अनेक ठिकाणी नव्याने छापेमारी केली. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेले कोलकाता पोलिसांचे माजी अधिकारी शांतनू सिन्हा बिस्वास आणि हिस्ट्रीशीटर बिश्वजीत पोद्दार उर्फ सोना पप्पू यांच्याशी संबंधित मनी लॉन्डरिंग प्रकरणाच्या तपासाच्या अनुषंगाने ही कारवाई करण्यात आली आहे.
अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, ईडीची पथके कोलकाता आणि मुर्शिदाबाद येथे एकूण नऊ ठिकाणी शोधमोहीम राबवत आहेत. या छापेमारीचा उद्देश प्रकरणाशी संबंधित अधिक पुरावे आणि कागदपत्रे गोळा करणे हा आहे. ज्या ठिकाणी ईडीकडून छापे टाकले जात आहेत, त्यामध्ये मोहम्मद अली उर्फ मॅक्स राजू आणि शांतनू सिन्हा बिस्वास यांचा पुतण्या सौरव अधिकारी यांच्या ठिकाणांचा समावेश आहे. याशिवाय, बिस्वासचा निकटवर्तीय सहकारी आणि कोलकाता पोलिसांचा सब-इन्स्पेक्टर रुहिल अमीन अली तसेच मुर्शिदाबाद येथील बिस्वास यांच्या घरावरही झडती घेण्यात येत आहे.
या प्रकरणात बिश्वजीत पोद्दार उर्फ सोना पप्पू याला ईडीने चौकशीनंतर 18 मे रोजी अटक केली होती. तर कोलकाता पोलिसांचे अधिकारी शांतनू सिन्हा बिस्वास यांना गेल्या आठवड्यात अटक करण्यात आली होती. यापूर्वी एप्रिल महिन्यात केंद्रीय तपास यंत्रणेने या प्रकरणाशी संबंधित स्थानिक व्यावसायिक जॉय एस कामदार यालाही अटक केली होती.
ईडीने यापूर्वी सांगितले होते की, बिश्वजीत पोद्दार उर्फ सोना पप्पू हा एक हिस्ट्रीशीटर गुन्हेगार आहे. तो आणि त्याचे सहकारी पश्चिम बंगालमध्ये जमीन बळकावण्याशी संबंधित अनेक प्रकरणांमध्ये वाँटेड होते. त्याचे नाव प्रथम 2015 मध्ये चर्चेत आले होते, जेव्हा बालीगंज रेल्वे यार्डमध्ये हिंसक संघर्ष झाला होता. तपास अधिकाऱ्यांच्या मते, त्यानंतर पोद्दारवर अनेक गुन्हे दाखल झाले. यामध्ये 2017 मधील हत्या प्रकरण आणि 2021 मध्ये प्रेसिडेन्सी कारागृहाबाहेर प्रतिस्पर्धी मुन्ना पांडे याच्यावर झालेल्या कथित हल्ल्याचाही समावेश आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode