
मुंबई, 22 मे (हिं.स.)। गेल्या काही महिन्यांपासून प्रचंड उकाड्याने हैराण झालेल्या मुंबईकरांना अखेर आज काहीसा दिलासा मिळाला. मुंबई उपनगरातील अनेक भागांत आज सकाळपासूनच रिमझिम पावसाच्या सरी कोसळल्या आणि वातावरणात सुखद गारवा निर्माण झाला. “आज येईल की उद्या” या आशेने पावसाची वाट पाहणाऱ्या नागरिकांची प्रतीक्षा अखेर संपली. अचानक बरसलेल्या पावसामुळे मुंबईकर सुखावले असले तरी चाकरमान्यांची काही काळ तारांबळ उडाल्याचे चित्र पाहायला मिळाले.
मुंबईत सकाळपासूनच ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळे उकाड्याची तीव्रता काही प्रमाणात कमी झाली होती. त्यानंतर मुलुंड, कांजूरमार्ग, भांडुप आदी परिसरात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाने हजेरी लावली. अचानक पडलेल्या पावसामुळे रस्त्यांवर धावपळ उडाली. कामावर जाणाऱ्या नागरिकांना आसरा शोधावा लागला. मात्र या सरींमुळे हवेत गारवा निर्माण झाल्याने नागरिकांनी मोठा दिलासा व्यक्त केला. पुढील दोन दिवसात मुंबई, नवी मुंबई, ठाण्यामध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकटासह आणि वादळी वाऱ्यासह हलका ते मध्यम पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
कोकण, पश्चिम महाराष्ट्रातही वादळी पावसाची शक्यता
पश्चिम आणि मध्य महाराष्ट्रात मान्सून पूर्व पाऊस पडणार असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगली, सोलापूर या जिल्ह्यांत काही ठिकाणी पाऊस होण्याचा अंदाज आहे.
दरम्यान, हिंगोली जिल्ह्यातील वसमत शहरासह तालुक्यातही मान्सूनपूर्व अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. अचानक सुरू झालेल्या पावसामुळे नागरिकांची धावपळ उडाली. उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळाला असला तरी या पावसाचा फटका शेतकऱ्यांना बसला असून शेती पिकांचे नुकसान झाल्याची माहिती समोर येत आहे.
सोलापुरातही पहाटेपासून ढगाळ वातावरण होते. हवामान विभागाने व्यक्त केलेला अंदाज खरा ठरत शहरातील विविध भागांत रिमझिम पावसाच्या सरी कोसळल्या. गेल्या दीड महिन्यापासून तापमानाचा पारा ४० अंश सेल्सियसच्या पुढे गेल्याने नागरिक त्रस्त झाले होते. अशात अचानक आलेल्या पावसामुळे अबालवृद्धांना दिलासा मिळाला आणि वातावरण आल्हाददायक झाले.
नाशिक जिल्ह्यातील येवला शहर आणि तालुक्याच्या उत्तर-पूर्व भागात काल संध्याकाळी अचानक हवामानात बदल झाला. जोरदार वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस कोसळल्याने नागरिकांची तारांबळ उडाली. अनेकांनी सुरक्षित ठिकाणी धाव घेतली. मात्र या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असून उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
धाराशिव जिल्ह्यातही काल वादळी वाऱ्यासह दमदार पाऊस झाला. तब्बल अर्धा तास कोसळलेल्या पावसामुळे उकाड्यापासून दिलासा मिळाला. मात्र अचानक आलेल्या पावसामुळे अनेकांची धावपळ झाली. काही भागांत वीजपुरवठाही खंडित झाला होता. राज्यातील विविध भागांत पडलेल्या या अवकाळी पावसामुळे नागरिकांना दिलासा मिळाला असला तरी शेतकऱ्यांची चिंता मात्र वाढली आहे.
उर्वरित महाराष्ट्रात पावसाचा आनंद घेतला जात असताना, विदर्भात मात्र उष्णतेची तीव्र लाट कायम आहे. अकोला आणि वर्धा यांसारख्या जिल्ह्यांमध्ये कमाल तापमान ४४ ते ४६ अंश सेल्सिअसच्या पुढे गेले असून तीव्र उन्हाच्या झळा नागरिकांना सहन कराव्या लागत आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule