
सार्वजनिक नागरी सुविधा समिती’चा आक्रमक पवित्रा
मालेगाव, 23 मे (हिं.स.) मालेगावच्या रस्त्यांवर बिनबोभाटपणे जनावरांची कत्तल सुरु असून त्यांचे निघणारे रक्त तसेच उद्योगांचे घातक रसायनयुक्त पाणी मोसम नदीत मिसळले जात आहे. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. त्यामुळे प्रशासनाविरोधात ‘सार्वजनिक नागरी सुविधा समिती’ने आता आक्रमक पवित्रा घेतला असून हे जलप्रदूषण तात्काळ थांबवावे आणि या गंभीर समस्येकडे डोळेझाक करणार्या अधिकार्यांवर कारवाई व्हावी, या मागणीसाठी समितीच्या वतीने गुरुवार, दि. २१ मेपासून अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषणाला सुरुवात केली आहे.
राज्य शासनाकडून गोवंश हत्या कायदा पारित करण्यात आल्यानंतरही मालेगावध्ये गोवंशाती कत्तल अजुनही सुरु आहे. त्याकडे प्रशासनाने डोळेझाक केली आहे. त्यातच या जनावरांच्या रक्त दिवसाढवळ्या मोसम नदीत जात असल्याने तेथील पाण्यालाही लाल रंग आल्याचे नजरेस पडते. त्याचबरोबर मालेगावसह नांदगाव आणि जळगाव जिल्ह्यातील अनेक पाणीपुरवठा योजना या धरणावर अवलंबून असल्याने लाखो नागरिकांच्या आरोग्याशी थेट खेळ सुरू असल्याची तक्रार केली जात आहे. तसेच, नदीपात्रात साचलेल्या सांडपाण्यामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढून साथीच्या आजारांचा सामना करण्याची वेळ नागरिकांवर येत आहे.
मालेगाव येथील सार्वजनिक नागरी सुविधा समितीचे अध्यक्ष रामदास बोरसे हे गेल्या १७ वर्षांपासून या प्रदूषणाविरोधात सातत्याने लढा देत आहेत. ‘मोसम नदी सुधार योजने’च्या नावाखाली शासनाचे शेकडो कोटी रुपये खर्च झाले, परंतु प्रत्यक्षात नदीची स्थिती ‘जैसे थे’च आहे.
समितीच्या पाठपुराव्यानंतर तत्कालीन जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी याप्रश्नी महापालिका, महसूल आणि पोलीस प्रशासनाची समिती पदाधिकार्यांसोबत संयुक्त बैठक घेतली होती. त्यावेळी दोन महिन्यांत हा प्रश्न निकाली काढण्याचे स्पष्ट आदेश शर्मा यांनी दिले होते. मात्र, वर्ष उलटूनही परिस्थिती बदललेली नाही.
बोरसे यांच्याबरोबर मालेगावकर विधायक संघर्ष समितीचे निखिल पवार, भरत पाटील, शेखर पगार, गुलाब पगारे, मच्छिंद्र शिर्के, गोपाल सोनवणे, चितेश असेरी, अक्षय महाजन, रमेश सकट, अनिल जाधव, राकेश पाटील, जयदीप जगताप, तुषार छाजेड, दिलीप पाटील, दिनेश साबणे, प्रदीप पहाडे, विनोद निकम, राकेश मगर, सागर पवार, अॅड. योगेश निकम, ललित गोरस, रमेश वाणी, सिद्धार्थ वारुळे, अतुल शिरोडे, वाहिब खान, रईस शहा, शकीद शेख, नीलेश सोनवणे, अक्षय वाघ, रामदास बच्छाव, रमेश जगताप आदि कार्यकर्त्यांनी या आंदोलनात सहभाग नोंदवला.
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV