
अलिबाग तालुक्यात ९४.०९ टक्के गुणांसह उल्लेखनीय यश
रायगड, 23 मे (हिं.स.) : रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत वाडगावने मुख्यमंत्री पंचायतराज अभियान पुरस्कारात उल्लेखनीय कामगिरी करत तालुकास्तरावर प्रथम क्रमांक पटकावला आहे. महाराष्ट्र शासनाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या या प्रतिष्ठेच्या अभियानात वाडगाव ग्रामपंचायतीला ९४.०९ टक्के गुण मिळाल्याने संपूर्ण तालुक्यात ग्रामपंचायतीचे कौतुक होत आहे.
ग्रामपंचायतींच्या कामकाजातील पारदर्शकता, विकासकामांची प्रभावी अंमलबजावणी, डिजिटल प्रशासन, स्वच्छता, कर वसुली तसेच शासनाच्या विविध योजना तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचविणे या निकषांवर मूल्यमापन करण्यात आले. या सर्व बाबींमध्ये वाडगाव ग्रामपंचायतीने उत्कृष्ट कामगिरी करत अव्वल स्थान मिळवले.
अधिकृत आकडेवारीनुसार, वाडगाव ग्रामपंचायतीला एकूण ९१ गुणांपैकी ८५.६३ गुण प्राप्त झाले. त्यांची टक्केवारी ९४.०९ इतकी नोंदविण्यात आली असून त्यामुळे ग्रामपंचायत अलिबाग तालुक्यात प्रथम स्थानी पोहोचली आहे. वाडगावच्या पाठोपाठ मापगाव ग्रामपंचायतीने ७९.३४ गुणांसह द्वितीय क्रमांक मिळवला.
पाणीपुरवठा व्यवस्था, स्वच्छता मोहीम, पर्यावरणपूरक उपक्रम तसेच ग्रामविकासाच्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी यामुळे वाडगाव ग्रामपंचायतीची विशेष दखल घेण्यात आली. ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच, सदस्य, ग्रामसेवक आणि ग्रामस्थ यांच्या सामूहिक प्रयत्नांचे हे यश असल्याची भावना गावकऱ्यांनी व्यक्त केली.
याबाबत बोलताना उपसरपंच सरिता भगत यांनी सांगितले की, “मुख्यमंत्री पंचायतराज अभियानातील हा प्रथम क्रमांक वाडगावच्या शाश्वत विकासाची साक्ष देणारा आहे. लोकसहभाग आणि प्रशासकीय शिस्त यांच्या जोरावर आम्ही हे यश मिळवले. भविष्यात वाडगावला आदर्श आणि स्वयंपूर्ण गाव म्हणून विकसित करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.”
-----------------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)