
जळगाव, 23 मे (हिं.स.) जळगाव शहरातील वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलिसांनी कठोर भूमिका घेत दोन सराईत गुन्हेगारांवर तडीपारीची कारवाई केली आहे.आगामी सण-उत्सव आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी ही कारवाई करण्यात आल्याची माहिती पोलिस प्रशासनाकडून देण्यात आली. राम उर्फ सोनू भगवान सरवन (रा. गुरुनानक नगर, जळगाव) व विशाल मुरलीधर दाभाडे (रा. रामेश्वर कॉलनी, चांगापाचा मंदिराजवळ, जळगाव) असं हद्दपार केलेल्या गुन्हेगारांचे नाव असून उपविभागीय दंडाधिकाऱ्यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ मधील कलम ५६ (१) अंतर्गत २१ मे रोजी हे कडक आदेश जारी केले.तडीपार करण्यात आलेल्या आरोपींमध्ये राम उर्फ सोनू भगवान सरवन (रा. गुरुनानक नगर, जळगाव) याचा समावेश असून तो शनिपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रहिवासी आहे. त्याच्यावर घरफोडी, दरोडा, बेकायदेशीर शस्त्र बाळगणे, मारामारी यांसारखे १३ हून अधिक गंभीर गुन्हे दाखल आहेत. यापूर्वीही तडीपारीचा आदेश असताना त्याने आदेशाचे उल्लंघन केल्याची नोंद आहे. तसेच एका श्वानावर अमानुष अत्याचार केल्याचा गंभीर प्रकारही त्याच्या विरोधात समोर आला होता.दुसरा आरोपी विशाल मुरलीधर दाभाडे (रा. रामेश्वर कॉलनी, चांगापाचा मंदिराजवळ, जळगाव) हा एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आहे. परिसरात घातक शस्त्रांचा धाक दाखवत नागरिकांना धमकावणे, घरफोडी, दुकाने फोडणे आणि गंभीर स्वरूपाचे गुन्हे करणे, यामुळे त्याच्याविरुद्ध अनेक तक्रारी होत्या. प्रतिबंधात्मक कारवायांनंतरही त्याच्या वर्तनात सुधारणा न झाल्याने अखेर तडीपारीची कारवाई करण्यात आली. प्रशासनाच्या आदेशानुसार, दोन्ही आरोपींना दोन दिवसांच्या आत जळगाव जिल्ह्याबाहेर जाणे बंधनकारक करण्यात आले आहे. तडीपारीच्या कालावधीत जिल्ह्यात प्रवेश करण्यासाठी सक्षम अधिकाऱ्यांची परवानगी आवश्यक राहणार आहे. तसेच ते ज्या ठिकाणी वास्तव्यास असतील, त्या परिसरातील स्थानिक पोलीस ठाण्यात नियमित हजेरी लावणेही बंधनकारक करण्यात आले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर