
अमरावती, 23 मे (हिं.स.)
मेळघाट व्याघ्र प्रकल्पांतर्गत धारणी तालुक्यातील चौराकुंड वनपरिक्षेत्रात चार रानगवे आणि एक भेकड विषारी पाणी प्यायल्यानं दगावल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
विषारी पाण्यामुळे प्राण्यांचा मृत्यू : चौराकुंड वनपरिक्षेत्रातील उत्तर अंजन झडप आणि चौराकुंड उत्तर खंड परिसरात जंगलगस्ती दरम्यान वन कर्मचाऱ्यांना प्रत्येकी तीन आणि एक असे एकूण चार रानगवे मृतावस्थेत आढळून आले. याच भागात एक भेकडही मृत अवस्थेत सापडला. रानगव्यांचा अचानक मृत्यू झाल्याची माहिती मिळताच चौराकुंड वनपरिक्षेत्र अधिकारी रवींद्र खेरडे यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांना याबाबत माहिती दिली.
प्राथमिक माहितीनुसार, विषारी पाणी प्यायल्यानं या प्राण्यांचा मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेनंबाबत शुक्रवारी दुपारी वनविभागाचे वरिष्ठ अधिकारी, पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांची चमू तसेच मेळघाटात कार्यरत काही स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी घटनास्थळी दाखल झाले. रात्री उशिरा चार रानगव्यांसह एका भेकडाचे शवविच्छेदन करण्यात आलं असून, प्राथमिक तपासात विषारी पाणी पिल्यामुळेच या प्राण्यांचा मृत्यू झाल्याचं सांगण्यात आलं आहे.
उन्हाळ्यामुळे सध्या जंगलातील नैसर्गिक जलस्रोत कोरडे पडले आहेत. त्यामुळे वनविभागाकडून जंगलात कृत्रिम पाणवठ्यांच्या माध्यमातून वन्यप्राण्यांसाठी पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. दरम्यान, उत्तर अंजन झडप आणि चौराकुंड उत्तर खंड परिसरात घडलेल्या या घटनेनंतर संबंधित पाणवठ्यांचे नमुने तसेच मृत प्राण्यांच्या शरीरातील अवयव फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत, अशी माहिती चौराकुंड वनपरिक्षेत्र अधिकारी रवींद्र खेर्डे यांनी दिली.
ही घटना अतिशय दुर्दैवी असल्याचे सांगत वनविभागाने याप्रकरणाची सखोल चौकशी सुरू केली आहे. जंगलात शुक्रवार रात्रीपासून गस्त वाढवण्यात आली असून आजही वनकर्मचाऱ्यांकडून सतत निरीक्षण सुरू आहे. तसेच परिसरातील इतर पाणवठ्यांचेही पाणी तपासलं जात आहे. वन्यप्राण्यांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना केल्या जात असून या घटनेचा संपूर्ण तपास केला जाईल, असं वनपरिक्षेत्र अधिकारी रवींद्र खेरडे यांनी स्पष्ट केलं.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी