लातूरच्या ‘ट्युशन एरिया’वर कारवाई
खासगी क्लासेससह इतर व्यवसाय बंद करण्याचे आदेश जिल्हा उद्योग केंद्राच्या निर्देशांनंतर परिसरात शुकशुकाट लातूर, 23 मे (हिं.स.) : लातूर येथील इंडस्ट्रियल इस्टेट को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेडमध्ये मूळ करारनाम्यानुसार उत्पादन क्षेत्राव्यतिरिक्त सुरू
नीट परीक्षा


खासगी क्लासेससह इतर व्यवसाय बंद करण्याचे आदेश

जिल्हा उद्योग केंद्राच्या निर्देशांनंतर परिसरात शुकशुकाट

लातूर, 23 मे (हिं.स.) : लातूर येथील इंडस्ट्रियल इस्टेट को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेडमध्ये मूळ करारनाम्यानुसार उत्पादन क्षेत्राव्यतिरिक्त सुरू असलेले खासगी ट्युशन क्लासेस, हॉस्टेल, खानावळी, अभ्यासिका आणि इतर व्यवसाय तत्काळ बंद करण्याचे आदेश जिल्हा उद्योग केंद्राने जारी केले आहेत. या आदेशानंतर शहरातील प्रसिद्ध ‘ट्युशन एरिया’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अष्टविनायक मंदिर परिसरात शुक्रवारी स्मशान शांतता पसरलेली दिसून आली.

जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक निखील पाटील यांनी लातूर औद्योगिक वसाहत सहकारी संस्थेच्या अध्यक्षांना यासंदर्भातील अधिकृत पत्र पाठवले आहे. या पत्रात नियमांचे उल्लंघन करून सुरू असलेले सर्व अनधिकृत व्यवसाय तातडीने बंद करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

मल्लिकार्जुन शिवलिंग भाईकट्टी आणि ऍड. प्रदीप मोरे यांनी केलेल्या तक्रारीनंतर जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली होती. या बैठकीतील चर्चेनुसार उद्योग संचालनालय, मुंबई तसेच स्थानिक प्रशासनाने कारवाईचे आदेश दिल्याचे समोर आले आहे. संबंधित व्यवसाय बंद करून त्याचा अनुपालन अहवाल जिल्हा उद्योग केंद्राकडे सादर करण्यासही सांगण्यात आले आहे.

आदेशाचे पालन न झाल्यास संबंधित संस्थांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही प्रशासनाने दिला आहे. शहरातील बहुसंख्य कोचिंग क्लासेस याच परिसरात असल्याने अनेक संचालकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. शुक्रवारी परिसरातील अनेक क्लासेस बंद असल्याचे चित्र दिसून आले. नेहमी विद्यार्थ्यांनी गजबजलेले रस्ते ओस पडले होते.

काँग्रेसकडून आदेशाला विरोध

दरम्यान, नीट पेपरफुटी प्रकरणानंतर लातूरमधील ट्युशन एरिया राज्यभर चर्चेत आला होता. या प्रकरणातील आरोपी मोटेगावकर यांचे इतर शहरांतील क्लासेस सील करण्यात आले असून काही ठिकाणी इमारतींवरही कारवाई झाली आहे. मात्र लातूरमध्ये अद्याप मोठी कारवाई न झाल्याने विविध चर्चा सुरू आहेत.

याच पार्श्वभूमीवर जिल्हा उद्योग केंद्राने २२ मे रोजी नोटीस काढत उद्योग भवन परिसरातील खासगी क्लासेस आणि इतर व्यवसाय बंद करण्याचे आदेश दिले. या आदेशाला काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अभय साळुंखे यांनी सोशल मीडियावर विरोध दर्शवला आहे. तसेच या निर्णयाबाबत जिल्हा उद्योग केंद्राला जाब विचारणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

अभय साळुंके यांनी घेतलेली भूमिका ही काँग्रेस पक्षाची अधिकृत भूमिका आहे की वैयक्तिक मत, याबाबत राजकीय वर्तुळात संभ्रम निर्माण झाला आहे. दरम्यान, त्यांच्या भूमिकेमुळे अनधिकृत व्यवसायांना पाठबळ दिले जात असल्याची चर्चा शहरात रंगू लागली आहे.

-----------------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande